सीझन ३ मधील इतर आयकॉन खेळाडूंमध्ये सरफराझ खान, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांचा समावेश, तिसरा सीझन २६ जून ते ८ जून दरम्यान वानखेडे स्टेडियमवर पार पडणार
मुंबई,: बहुप्रतीक्षीत T20 मुंबई लीग २०२५ ची उत्सुकता शीगेला पोहोचलेली असतानाच मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आज आयकॉन खेळाडूंची नावे जाहीर केली, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य राहाणे यांचा समावेश आहे.
T20 मुंबई लीग ही भारतातील आघाडीच्या फ्रँचाईझी देशांतर्गत T20 स्पर्धांपैकी एक असून ती सहा वर्षानंतर परत येत आहे. याचा तिसरा सीझन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २६ मे ते ८ जून दरम्यान होणार आहे.
आयकॉनिक खेळाडूंमध्ये सरफराझ खान, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांचाही समावेश आहे. सर्व आठ खेळाडूंनी भारताचे सर्वोच्च पातळीवर प्रतिनिधीत्व केले असून त्यावरून मुंबईच्या क्रिकेट क्षेत्रात असलेली असामान्य गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
"आपल्या असामान्य कामगिरीद्वारे मुंबईसाठी अभिमानास्पद ठरलेल्या आठ आयकॉन खेळाडूंची नावे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे खेळाडू मुंबई क्रिकेटचा वारसा, वृत्ती आणि गुणवत्तेचे प्रतीक आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे उभरत्या गुणवत्तेला प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल, शिवाय त्यांच्यासाठी ही शिकण्याची उत्तम संधी ठरेल. आम्ही भारतासाठी नव्या दमाचे खेळाडू शोधून, त्यांना घडवण्यासाठी बांधील आहोत. लीगमध्ये या खेळाडूंच्या असण्याने शान वाढेल आणि चाहत्यांना थरारक व अविस्मरणीय अनुभव मिळेल," असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.
प्रत्येक फ्रँचाईझीला एका आयकॉन खेळाडूची त्यांच्या स्क्वॅडमध्ये निवड करण्याची मुभा असते व त्यामुळे त्यांचा अनुभव तसेच स्टार पॉवर वाढते. एमसीए लवकरच लिलावाची तारीख जाहीर करेल.
आधीच्या आवृत्तीमध्ये T20 मुंबई लीगने उद्योन्मुख खेळाडूंना या क्षेत्रातील नामवंत खेळाडूंसह आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली होती. आगामी सीझनलाही भरभरून प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २८०० खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
T20 मुंबई लीगमध्ये आठ फ्रँचाईझीचा समावेश आहे – नॉर्थ मुंबई पँथर्स (हॉरिझॉन स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), एआरसीएस अंधेरी (आर्क स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड), ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट (ट्रान्सकॉन ट्रायम्फ नाइट्स प्रायव्हेट लिमिटेड), नमो बांद्रा ब्लास्टर्स (पीके स्पोर्ट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड), ईगल ठाणे स्ट्रायकर्स (ईगल इन्फ्रा इंडिया लि.) आणि आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्ज (वर्ल्ड स्टार प्रीमियर लीग एलएलपी) आणि दोन नवीन टीम्स – सोबो मुंबई फालकन्स (रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लि.) आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स (रॉयल एज स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट).