जालना लाठीमार प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर !

Santosh Gaikwad September 03, 2023 05:46 PM


जालना :  जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. याप्रकरणी सरकारने जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. तर जालन्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राहुल खाडे व अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी मुकूंद आघाव यांची बदली करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी बुलडाणा येथे 'शासन आपल्या दारी'  या कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. 


मुख्यमंत्रयांचा विरोधकांवर निशाणा 


मुख्यमंत्री म्हणाले की, 'जालन्यात दुर्दैवी घटना झाली त्याचे मलाही दुःख झाले. काही लोकं तिथे येऊन गेले. त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. ज्या लोकांनी मराठा आरक्षणाचे गळे घोटले. ते लोकं तिथे गळा काढायला गेले. महाविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टात हे आरक्षण गेले. अशोक चव्हाण तुम्ही उपसमिती अध्यक्ष होते, तुम्ही काय केले?', असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारवर निशाणा साधला.

 

'माजी मुख्यमंत्री यांनी मुक मोर्चाला 'मुका मोर्चा' असं संबोधले. मराठा समाज फार संयमी आहे. शांततेत असलेले आंदोलनात दगडफेक कुणी केली? सामाजिक सलोखा कोण बिघडवत आहे? तुम्ही राजकीय पोळू भाजू नका.' अशी विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्र्यांनी 'साडे तीन हजार तरुणांना नियुक्त्या देण्याचे काम मी मुख्यमंत्री झाल्यावर केले. असल्याचे सांगितले.


यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. मी मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या जाणार असं चालू झाले. सरकार पडता पडता, अजितदादा आले. आता म्हणतात मुख्यमंत्री बदलणार. मी काय तुमचं घोडं मारलंय? जनता माझ्याबरोबर आहे. आता सगळे ज्योतिषी बंद झाले.' अशी टीका त्यांनी केली. 'रस्त्यावर उतरून काम करणारे आमचे सरकार आहे. ऑनलाईन किंवा फेसबुकवरुन काम करणारे आमचे सरकार नाही. त्यांच्या सरकारच्या काळात जाणीवपूर्वक प्रकल्प बंद पाडले.', असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तसंच, 'गेल्या वर्षात ८ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. केंद्र सरकार नदी जोड प्रकल्पासाठी अनुकूल आहे. आम्ही 'लेक लाडकी' ही योजना करत आहोत. १८ वर्षे होईपर्यंत तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा होतील.', असं त्यांनी सांगितलं.


पोलीस अधिका-यांची चूक काय ? 

सौम्य लाठीमार करण्याचे आदेश हे सरकारचे होते मग सरकार दोषी आहे त्यात पोलीसांची चूक काय असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे त्यामुळे  सरकार दोषी आहेत पोलीस नाहीत त्यामुळे सरकारने पायउतार व्हावे असेही पटोले म्हणाले.