सुनिल तटकरेंना रायगडमधून उमेदवारी , अजित पवारांची घोषणा !

Santosh Gaikwad March 26, 2024 06:53 PM


पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) रायगड मतदारसंघात सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत तटकरेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली. तसंच, येत्या २८ तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाणार असल्याचीही माहिती अजित पवार यांनी दिली आहे. 


अजित पवार म्हणाले की, आम्ही एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीच्या ४८ जागांबद्दल महाराष्ट्रात कोणी कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल ठरवलं आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झालं आहे. फक्त आता २८ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र बसून पत्रकार परिषदत घेत इतर उमेदवारांची नावं जाहीर करणार आहोत. अजित पवार म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी आम्ही आघाडीच्या बाजूने लढलो. तर देवेंद्र फडणवीस, शिवसेना महायुती म्हणून लढले. त्यावेळी भाजपा २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस, नवनीत राणा, १, तर एमआयएमची १ जागा.., असं म्हणत अजित पवार यांनी यानुसार जागा दिल्या गेल्या असल्याचं म्हटलं आहे.


पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या एक नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते. तर एमआयएमची एक जागा अशा निवडून आल्या होत्या. मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्रपक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एक - एक लोकसभा आणि आमदारांवर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बाकीची टिम आमची काम करणारच आहे. शिवाय जिथे महायुतीचे उमेदवार असतील तिथे मंत्री व आमदारांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे असेही ठरल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.