ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन; हिंदी मराठी चारशे सिनेमांमध्ये अभिनय

Santosh Sakpal June 04, 2023 09:06 PM

चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत; वयाच्या ९४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; 

 sulochana latkar died

कालपासून होत्या व्हेंटीलेटरवर

सुलोचना दिदी यांना ९ मे रोजी रात्री एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तिथे श्वसन आजारावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर शनिवारी (ता.३) रात्रीपासून त्यांना व्हेटींलेटर (कृत्रिम जीवरक्षक प्रणाली) वर ठेवण्यात आले होते. अशी माहिती त्याची कन्या कांचन घाणेकर यांनी दिली आहे.

सुलोचना दीदींची अभिनय कारकीर्द

सुलोचना दीदींची प्रतिमा आजही लाखो सिनेरसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. त्यांनी चरीत्र भूमिका चित्रपटात साकारल्या. सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई त्यांनी पडद्यावर उत्तमपणे वठवली. ती असंख्य रसिकांना भावली.

'वहिनींच्या बांगड्या'पासून 'धाकटी जाऊ'

सुलोचना दिदींचे अनेक चित्रपच खूपच गाजले. 1953-54 मध्ये सुलोचना यांचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे सिनेमे खूप गाजले. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

सुलोचना दिदींचे काही खास चित्रपट

सुलोचना दिदींचे मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी 30 ते 40 चित्रपट केले असतील. ‘दिल देके देखो’ या 1959 मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली.

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुलोचना दीदी यांनी दिलेलं योगदान अमुल्य आहे. सुलोचना लाटकर यांची सुलोचना दीदी या नावानेच कलाक्षेत्रामध्ये ओळख होती. सुलोचना दीदींची कारकीर्द कोल्हापुरात भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलत गेली. चित्रपटाआधी जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल टाकलं. हा प्रयोग शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी झाला होता.

मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचना दीदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापुरात ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ असे चित्रपट केले.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

त्यानंतर 1995 पर्यंत त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या ‘आई’ची भूमिका वठवली. मराठीत त्यांनी 50, तर हिंदीत 250 सिनेमे केले. सुलोचना दीदींना 1999 मध्ये ‘पद्मश्री’, तर 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

सुलोचना दीदींच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - तावडे

सुलोचना दिदी यांच्या निधनानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, ''सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा. त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका सर्वांनाच आपल्या घरातील थोरामोठ्यांच्या मायेची आठवण करून देतात. त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी त्यांना 'महाराष्ट्र भूषण', 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातीलच एक ज्येष्ठ आणि मायाळू व्यक्ती हरपल्याची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. सुलोचना दीदींच्या आत्म्यास शांती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना!''