ॲमस्टरडॅम येथील अभ्यासभेटीत विधीमंडळ सदस्यांनी जाणून घेतली विविध क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

Santosh Gaikwad August 28, 2023 11:49 PM


ॲमस्टरडॅम / २८ ऑगस्ट, २०२३  – दुग्धउत्पादन, कृषीप्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञान यात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने प्ररस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने नवी भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा अशी शुभकामना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.


महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, लंडन (यु.के.) या तीन देशांच्या अभ्यासदौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व डॉ.नीलम गोऱ्हे या करीत आहेत. आज दिनांक 28 रोजी ॲमस्टरडॅम येथे भारताच्या राजदूत  रिनत संधू तसेच तेथील कृषी मंत्रालयातील अधिकारी फ्रेडरिक वोसेनोव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या अभ्यासभेटीत आधुनिक कृषीप्रक्रिया तंत्रज्ञान, आरोग्य, प्रदूषणनियंत्रण, जलव्यवस्थापन, पूरनियंत्रण, नैसिर्गिक जलस्त्रोत संवर्धन, शिक्षण, दुग्धप्रक्रिया  या क्षेत्रांशी संबंधित विषयांवर शिष्टमंडळ सदस्यांनी माहिती जाणून घेतली. 


 ॲमस्टरडॅम येथील स्थानिक स्वशासन संस्थेतील सदस्या प्राची कुलकर्णी यांनी तेथील स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील राज्यव्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत अभिजित वंजारी, मनिषा चौधरी,  सीमा हिरे, श्रीमती प्रज्ञा सातव, मनोहर चंद्रिकापुरे यांनी सहभाग घेतला. शिष्टमंडळाच्या नेत्या विधानपरिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते भारताच्या राजदूत श्रीमती संधू तसेच  सर्व मान्यवरांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 


जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या खूर आणि लाळ रोगांवरील लसनिर्मिती संदर्भात वडील डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांचे योगदान, नेदरलँड्सने त्यावेळी घेतलेला पुढाकार या आठवणींना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उजाळा दिला. दुग्धउत्पादन व तंत्रज्ञान यात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने प्ररस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा अशी शुभकामना त्यांनी या वेळी व्यक्त केली. यावेळी नेदरलँड्स येथील मराठी मंडळाचे शिवम जोशी, अमेय धायगुडे,  वैशाली नार्वेकर,   ऋतुजा केळकर यांनी मराठी भाषा आणि  संस्कृती याच्या संवर्धनासाठी येथे आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.