"विशेष जन सुरक्षा विधेयक" विरोधात जनतेचा एल्गार – आवाज दाबण्याचा डाव फसवूया

Santosh Sakpal April 22, 2025 05:55 PM

मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)

महाराष्ट्र सरकारने सादर केलेले “विशेष जन सुरक्षा विधेयक” हे खूपच धोकादायक आहे. या कायद्यामुळे कोणताही सामान्य नागरिक जर सरकारविरोधात आवाज उठवेल, आंदोलने करेल किंवा अन्यायाविरोधात उभा राहील, तर त्याला शहरी नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकले जाऊ शकते.

हा कायदा केवळ दहशतवाद किंवा हिंसक कृत्यांवर थांबत नाही, तर शांततेत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर, पत्रकारांवर, शिक्षकांवर, विद्यार्थ्यांवर आणि सामान्य जनतेवरही लागू होऊ शकतो. त्यामुळे सत्य बोलणाऱ्यांचा आवाज गुदमरून जाईल.

या विधेयकामुळे काय धोके आहेत?स्वतःचा विचार मांडणं गुन्हा ठरेल. सरकारच्या विरोधात काही बोललं, लिहिलं किंवा पोस्ट केलं, तरी कारवाई होऊ शकते. शांततेत आंदोलन करणं बंद होईल. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, नागरिक — यांना त्यांचा हक्क मागायचाच नाही.

प्रत्येक विचारवंत, कार्यकर्ता, पत्रकार धोक्यात. ज्या लोकांनी समाजासाठी काम केलं, तेच देशविरोधी ठरणार?

लोकशाहीवर थेट हल्ला! या देशाच्या संविधानाने आपल्याला बोलण्याचा, लिहिण्याचा, संघटित होण्याचा व निषेध करण्याचा हक्क दिला आहे. पण हा विधेयक या सगळ्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न करतो. तो भीती आणि दडपशाहीचं वातावरण तयार करतो.

आमची ठाम मागणी हे विधेयक तात्काळ रद्द करावे. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार जपावे.अशा महत्त्वाच्या विषयांवर जनतेची मते ऐकून निर्णय घ्यावेत.

हा कायदा जर मंजूर झाला, तर आपली लोकशाही कमकुवत होईल, आणि सामान्य माणसाचं जगणं अजून कठीण होईल. म्हणून आम्ही – नागरिक, विद्यार्थी, कामगार, शिक्षक, पत्रकार आणि सर्वच जागरूक जनता – एकत्र येऊन याला विरोध करतो.

हा कायदा नाही तर हक्क हवेत, भीती नाही तर स्वातंत्र्य हवं!