दक्षिण आफ्रिकेनं केला विश्वविक्रम; वनडे क्रिकेटमध्ये पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

Santosh Sakpal March 22, 2023 12:00 AM

सेनवेस पार्क : वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय संपादन केला आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातल्याने नाणेफेकही झाली नाही. दुसरा एकदिवसीय सामना वेस्टइंडिजने ४८ धावांनी जिंकला. परंतु, तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करून दक्षिण आफ्रिकेनं वेस्टइंडिजला ४ विकट्सने पराभूत केलं. त्यामुळे मालिकेत १-१ ने बरोबरी झाली.

दक्षिण आफ्रिकेनं २००६ मध्ये जोहान्सबर्गच्या वांडरर्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३५ धावांचं लक्ष्य गाठताना ८.७८ च्या स्ट्राईक रेटनं ४९.५ षटकात ४३८ धावा कुटल्या होत्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली होती. पण वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यातही आफ्रिकेनं पुन्हा एकदा विश्वविक्रमला गवसणी घातली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मोठा विजय मिळवला. फक्त ३० षटकांत २५० किंवा त्याहून अधिक धावांचं लक्ष्य गाठण्याचा विक्रम आफ्रिकेच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. अशाप्रकारचा विश्वविक्रम करणारा दक्षिण आफ्रिका संघ जगात पहिला ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाने अशाप्रकारचा कारनामा केलेला नाही. दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात ८.९५ च्या रनरेटने २०० हून अधिक धावांचं लक्ष्य गाठलं. वनडेत रनचेजमध्ये आफ्रिकेचा हा आतापर्यंतचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.

दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वेस्टइंडिजने ४८.२ षटकात सर्वबाद २६० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी ५० षटकांत २६१ धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. पण हेनरिक क्लासेनच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर २९.३ षटकात ६ विकेट्स गमावत धावांचं लक्ष्य गाठलं.