आमचं सरकार आल्यावर घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवू ! आदित्य ठाकरेंचा इशारा

Santosh Gaikwad July 01, 2023 07:31 PM


मुंबई : मुंबई महापालिकेतील कथित घोटाळयांविरोधात ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला.  मुंबई पालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचारावरुन ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं. तुमच्या फाईली तयार आहेत. आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या प्रत्येक घोटाळयाची फाईल बाहेर काढून  मुंबईची लूट करणा-या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.   


मेट्रो सिनेमा ते बीएमसी असा मोर्चा निघाला या मोर्चेत आदित्य ठाकरेंसह शिवेसनेचे नेते सहभागी झाले होते. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या मोठया संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले हेाते. यावेळी मोर्चेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांचा उत्साह आणि जोश पाहिल्यानंतर समझनेवाले को इशारा काफी है. हे मुंबईतलं भगवं वादळ आहे, महाराष्ट्राचं वादळ अजून बाकी आहे. खोके सरकारच्या भूतांना पळवून लावायचं आहे, त्यामुळे आज हनुमानाचं दर्शन घेऊन आलोय. वर्ष झालं महापालिकेत महापौर नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरकारभार सुरु आहे. यावेळी त्यांनी दाढी खाजवून एकनाथ शिंदेंवर टीका केली.  


पालिकेतील घोटाळयांचा पाढा आदित्य ठाकरे यांनी वाचला. आदित्य ठाकरे म्हणाले, पहिला घोटाळा हा रस्त्यांचा घोटाळा आहे, पाच कंत्राटदार मित्रांसाठी पाच पाकिटे बनवली. पाच विभागांतील रस्त्यांची काम पाच कंत्राटदारांना वाटून दिली. ऑगस्टमध्ये पहिल्यांदा पाच हजार कोटींचं कंत्राट निघालं. पण, एकाही मित्राने कंत्राट न भरल्याने ते रद्द करण्यात आलं. नंतर एक हजार वाढवून सहा हजार कोटींना कंत्रात नेण्यात आलं. यावेळी ४० टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला. पहिल्यांदाच रस्ते कंत्राटदारासाठी १८ टक्के वाढवून दिले,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

दुसरा घोटाळा हा खडी घोटाळा झाला आहे. तिसरा घोटाळा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा हे सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे. आम्ही काढलेल्या घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी विनंती आम्ही नविन राज्यपालांकडे केली आहे. जुन्या राज्यपालांकडे गेलो तर त्यांच्याकडून महारुषांचा अपमान झाला असता. ते भाजपाल होते. नव्या राज्यपालांकडे तक्रार केली. लोकायुक्तांकडे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांनी याबाबत आपण विचार करु, असं सांगितलं. पण अजून झालं नाही. मुंबईवर एसआयटी लावली तशी ठाणे, नागपूर, पुणे महापालिकांवर लावा असेही ठाकरे म्हणाले. 


आयपीएस अधिका-यांकडून नगरसेवकांवर दबाव 


खोके सरकारकडून माजी नगरसेवकांना फोडण्यासाठी आयपीएस अधिका-यांकडून फोन केले जात आहेत याचे काही रेकॉर्डिंग माझयाजवळ आहेत लवकरच ते उघड करेने असा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 'मुंबई कधी दिल्लीसमोर झुकली नाही, मात्र त्यांना मुंबईला दिल्लीसमोर कटोरा घेऊन उभं करायचं आहे. शाखेवर बुलडोझर चालवला. छत्रपती शिवरायांची मूर्ती होती, बाळासाहेबांचा फोटो होता. ज्या दिवशी सरकार येईल त्यादिवशी यांच्यावर बुलडोझर चालवायचा आहे,' असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.


मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या बापाची  : संजय राऊत 


ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या मोर्चाला संबोधित करताना शिंदे फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली. मुंबई महापालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-भाजपला आव्हान दिलं आहे. मुंबई शिवसेनेची आहे आणि मुंबई महापालिका ही देखील शिवसेनेच्या बापाची आहे. ३० वर्षे हा भगवा झेंडा फडकवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्राची ४० खोके कारस्थान करताहेत.  मुंबईकर म्हणताहेत आत्ता निवडणुका घ्या चोर कोण आणि शोर कुणाचा हे कळेल. माझं आव्हान आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून मोर्चा पहावा तुमची बुब्बुळ बाहेर येतील, असंही राऊत यावेळी म्हणाले.