शिंदे गट- भाजपात वादाची ठिणगी : भाजपकडून सापत्न वागणूक किर्तीकरांचा आरोप !

Santosh Gaikwad May 26, 2023 07:59 PM

मुंबई : भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा घणाघाती आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केल्याने शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.   


खासदार किर्तीकर म्हणाले की, शिवसेना  आता एनडीएचा  घटकपक्ष असूनही कामं होत नसल्याची तक्रार त्यांनी केलीय. शिंदेबरोबर आलेले आम्ही 13 खासदार एनडीएचे घटक आहोत आणि घटक पक्षाला तितका दर्जा दिला पाहिजे त्यांची कामे होत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. तर या विषयी देवेंद्र फडणवीस यांना मध्यमांनी विचारले असता त्यांनी  किर्तीकर यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही, या कपोकल्पीत बातम्या असल्याचं म्हटलं आहे.  शिंदे गटाच्या खासदाराकडून भाजपवर आरोप केला जात असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्रयाकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतूक केले जात आहे.  पंतप्रधान मोदी यांचे पाठबळ राज्याच्या विकासात आहे असे  मुख्यमंत्री शिंदेकडून सांगितले  जात आहे. 


शिंदेंच्या शिवसेनेला आगामी लोकसभा निवडणुकीत २२ जागा लढवायच्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र भाजप २२ जागा देण्यास तयार नाही असं भाजपच्या गोटातून समजतंय. बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदारांसह बैठक झाली. २०१९ मध्ये जेवढ्या जागा शिवसेनेनं लढल्या तेवढ्या जागांची मागणी शिंदे गटाची आहे. अमरावतीची जागा अपक्ष नवनीत राणा यांनी जिंकल्यावर भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे ती जागा भाजपच लढेल अशी शक्यता आहे. आता शिंदे गटाची मागणी भाजपने धुडाकवल्यास सत्ताधाऱ्यांतच वाद पेटण्याची शक्यता आहे. 

कोंबडयांचा खुराडा, राऊतांचा आरोप 

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपावरून शिंदे गटावर टीका केली आहे. शिंदे गटाला 22 काय 5 जागाही मिळत नाहीत असा दावा राऊतांनी केलाय. शिंदे गट हा पक्ष नसून कोंबडयांचा खुराडा असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.