आधी टीका, आता स्तुतीसुमने : शिंदे, फडणवीस आणि पवार एकाच मंचावर !

Santosh Gaikwad July 08, 2023 09:13 PM


गडचिरोली :  राज्यात ट्रिपल इंजिन सरकार स्थापन झाल्यावर  गडचिरोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाला आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मंचावर आले होते. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच कार्यक्रमात एकत्र होते. विरोधी पक्षनेतेपदावर असताना सरकारवर टीका करणारे अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करीत स्तुतीसुमने उधळली. तर शिंदे फडणवीस यांनीही अजितदादांचे कौतूक केले. विशेष म्हणजे, यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रयांनी खास टोपी परिधान केली होती. आदिवासी बांधवांकडून तिन्ही नेत्यांचा सन्मान करण्यात आला होता.


मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. लोकहितासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४०० पेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

तुमच्या नावात जीत आहे : शिंदे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. जेव्हा कष्टकरी आणि क्षमता असलेल्या माणसावर अन्याय होतो, तेव्हा अजित पवारांसारखा प्रसंग घडतो असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. तोंडात अंजीर आणि हातात खंजीर असलेल्यांचे काय करायचे हे अजित पवार यांना कळतं. घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा मोकळेपणाने बोलणारे चांगले. अजित पवार तुमच्या नावात जीत आहे. त्यामुळे चिंता नको आपला विजय निश्चित आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


तिघे त्रिशूळ म्हणून काम करणार : देवेंद्र फडणवीस 

राष्ट्रवादीतून अजित पवारांचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्याच कार्यक्रम उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिघांच्या एकत्रित शक्तीला शंकराच्या त्रिशूळाची उपमा दिली. तसेच शंकराच्या तिसऱ्या डोळ्याची उपमा देत तिघे त्रिशूळ म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच जे सामान्य जनतेचा छळ करतील  विनाशासाठी आम्ही शंकराचा तिसरा डोळा ही होणार असल्याचे फडणवीसांनी म्हटलं. तसेच छत्तीसगड, झारखंडच्या धर्तीवर गडचिरोलीमध्येही स्टील सिटी उभी करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.


अजित पवारांकडून शिंदेचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख 

अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पवार म्हणाले, गेली ९ वर्षे देशाच्या सर्वांगिण विकासासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम काम करत आहे. अशा वेळी राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असेल तर राज्यात विकासाचे काम करणे अधिक गतीने होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या महायुतीसोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झालो आहेात. गडचिरोली मधील अधिकाऱ्यांना गडचिरोलीत राहून जनतेचे काम करण्याची तंबी अजित पवारांनी यावेळी दिली आहे. जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री गडचिरोलीत येतात, तेव्हा मंत्रालयातील सचिवांनी देखील इथे हजर राहायला हवं. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गडचिरोलीत पोस्टिंग असताना नागपुरात राहून नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिले पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.  

-------