अजित पवारांच्या या वागण्याने पवारांनी राजीनामा मागे घेतला : राज ठाकरे चा टोला

Santosh Gaikwad May 07, 2023 12:14 AM

    रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी बारसू रिफायनरी प्रकल्प आणि शरद पवारांचा राजीनामा यावर भाष्य केलं. शरद पवारांनी खरच राजीनामा दिला होता, पण अजित पवारांचं वागणं पाहून त्यांनी विचार बदलला असा टोला राज ठाकरेंनी अजित पवारांना लगावला.


    राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं त्यांनी खरच राजीनामा दिला होता, पण अजित पवारांचं वागणं पाहून त्यांनी मागे घेतला असावा. हे आत्ताच असे वागताहेत, तर पुढे कसे वागतील असे त्यांना वाटले असावे. जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या, जे होतंय ते चांगलं होतंय असं  त्यांना वाटत होतं असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. यावेळी त्यांनी ए.. तू गप्प, ए... तू शांत बस, ए... तो माईक हातातन घे... हे सर्व पवार साहेबांनी पाहिलं, तर त्यांना वाटलं असेल की मी आत्ताच राजीनामा दिला तर हे असं वागतंय, उद्या मलाही म्हणेल, असेही राज ठाकरे म्हणाले.


    बारसू रिफायनरीला राज ठाकरेंचा विरोध


    यावेळी राज ठाकरेंनी बारसू रिफायनरीला विरोध केला. जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपलं. कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय नाही असे म्हणत जमीनी विकू नका असे आवाहन राज ठाकरेंनी कोकणवासियांना केले.


    पुढे बोलताना ते म्हणाले, तुमच्या पायाखालून शंभर-शंभर, हजार-हजार एकर जमीन निघून जातेय, तुम्हाला समजत नाहीये का? आधी तुमच्याकडून कवडीमोल भावाने जमीन घेतली जाते, नतंर ते सरकारकडून पन्नासपट जास्त किंमत घेतात. नाणार, बारसूमध्ये हे प्रकल्प होणार ऐकल्यावर माझा संताप झाला. कोकणातल्या निसर्गाची आपल्याला किंमत नाही. सगळं तुमच्या हातून निसटल्यावर डोक्याला हात मारावा लागेल. कोण जमीन घेतंय, काय होतंय हे आपल्याला कळत नाही, कारण आम्ही बेसावध आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.