नाट्यसंकुलाच्या दुरुस्तीसाठी विश्वस्त मंडळ सर्वोतोपरी मदत करणार - शरद पवार

Santosh Gaikwad July 01, 2023 03:24 PM

मुंबई - अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून यासाठी सर्वोतोपरी मदत विश्वस्त मंडळ करेल असे आश्वासन नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आणि बैठकीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी दिले. 

सदर बैठक तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विश्वस्त  उदय सामंत,  शशी प्रभू,  गिरीश गांधी,  अशोक हांडे आणि   मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली त्यावेळी ते बोलत होते. सभेला महाराष्ट्रभरातील नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.

लवकरच होणारे १०० वे नाट्य संमेलन विभागीय पातळीवर घेण्यात यावे आणि मुख्य कार्यक्रम मध्यवर्ती ठिकाणी साजरा व्हावा आणि वैदर्भीय शैलीतील नाट्य प्रकार झाडीपट्टी रंगभूमीवरील कलाप्रकाराचे सादरीकरण महाराष्ट्राच्या इतर भागातही व्हावे असेही सुचवले गेले.नियोजित शंभराव्या आ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.  जब्बार पटेल हेच असणार आहेत.

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष  प्रशांत दामले ह्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाच्या नूतनीकरणाचा अहवाल सादर केला. उर्वरित कामांसाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर नाट्यसंकुल प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करताच सर्व विश्वस्तांनी ह्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. कोषाध्यक्ष   सतीश लोटके यांनी दुरुस्ती खर्चाचा अहवाल सभेपुढे सादर केला.तर प्रमुख कार्यवाह   अजित भुरे ह्यांनी शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या विषयी आलेल्या सूचना सभेसमोर मांडल्या. संमेलनाची रूपरेषा लवकरच आखण्यात येणार आहे. यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. नियोजित १०० वे संमेलन उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी सभेत नियामक मंडळ सदस्य व विश्वस्तांनी सूचना मांडल्या. 


विश्वस्त, उद्योग मंत्री  उदय सामंत यांनी सांगितले की, नाट्यसंकुलाच्या दुरूस्तीच्या कामासाठी शासनही सहकार्य करील. उपाध्यक्ष   नरेश गडेकर ह्यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सहकार्यवाह   समीर इंदुलकर ह्यांनी सदस्यांचे आभार मानले.