शरद पवार- अजित पवार गुप्त भेट : पृथ्वीराज चव्हाणांना वेगळीच शंका ..

Santosh Gaikwad August 12, 2023 10:57 PM


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करीत भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतल्याचे समेार आले आहे. काका पुतण्याच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळयासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर दुसरीकडे वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. 


या कार्यक्रमानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याचे समोर आले आहे एका व्यावसायिकाच्या घरी ही भेट झाली असून या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे समजते. या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडीत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले त्यानंतर त्यांनी पक्षावरही दावा दाखल केला हेाता. काही दिवसांपूर्वीच मुंबईत अजित पवार यांच्यासोबत गेलेले मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर आता काका पुतण्यांच्या गुप्त भेटीने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही नेत्यांकडूनही अजून प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. 


पृथ्वीराज चव्हाणांना वेगळीच शंका ..


शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार गटाने जरी भेट झाल्याचं नाकारलं असलं तरी अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे माध्यमांकडे याचे व्हिडीओ आहेत. जर अशी भेट झाली असेल तर दोन्ही नेत्यांपैकी कुणीतरी महाराष्ट्रासमोर येऊन हे काय चाललंय, हे सांगणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन बैठका झाल्या. त्यात विविध नेते मंडळीही उपस्थित होते. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत".


काही जणांनी (भाजप पक्षनेतृत्व) अजित पवारांना १० तारखेच्या सुमारास किंवा कधीतरी मुख्यमंत्री करतो, असा शब्द दिला होता. तो शब्द जर पूर्ण झाला नाही, तर त्यांचा पवित्रा काय असणार आहे? यासंदर्भात चर्चा झाल्याचं नाकारता येऊ शकत नाही", अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली.


तसेच बाकीही नेते इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे, अशा बातम्या सातत्याने येत आहेत. खरतंर राष्ट्रवादी हा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता. या पक्षाचे वरिष्ठ नेते असे भेटतात, त्याला आपण कौटुंबिक भेट कशी म्हणू शकतो?, असा सवालही त्यांनी विचारला. त्याचवेळी दोघांपैकी एकाने कुणीतरी समोर येऊन स्पष्ट करायला हवं की या भेटी नेमक्या कशासाठी झाल्या? त्यामुळे कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर होईल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.