मुंबई : सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलला हे घोषित करताना आनंद होत आहे की, भारतीय सेवा क्षेत्रासाठी हे वर्ष विक्रमी ठरले आहे. या आर्थिक वर्षात ३२२.७२ बिलियन डॉलर्स मूल्य नोंदवत सेवा क्षेत्राने ३०० बिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
सकल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राची हिस्सेदारी ५४% असून, आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये २६.७९% वृद्धी दरासह ३२२.७२ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या वार्षिक मूल्यासह या क्षेत्राने आधीचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत.
भारतात या क्षेत्रातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, त्याच्या विकासाला चालना देण्यासाठी एसईपीसी सरकारच्या सहयोगाने व्यापारी प्रतिनिधी मंडळे, बी२बी बैठका, बाजारपेठेला अनुसरून हाती घेण्यात आलेले विशिष्ट उपक्रम - एमएआय इत्यादींसह अथक काम करत आहे. सेवा क्षेत्र ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने पुढे जात राहावे यासाठी सरकार आणि एसईपीसीकडून हे प्रयत्न केले जात आहेत. या क्षेत्रातील वर्तमान आकडेवारी या अद्भुत यशाचे समर्थन करते.
आपली आखून देण्यात आलेली उद्दिष्ट्ये पूर्ण केल्यानंतर आता दीर्घकालीन दृष्टिकोनासह, भारताला जागतिक बाजारपेठेमध्ये 'सर्व्हिसेस हब' म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी, ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या पुढे जाण्यासाठी सेवा क्षेत्र प्रयत्नशील आहे. सेवा क्षेत्रातील सर्व उद्योगांना वृद्धीसाठी मदत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट असून ते वेळेआधीच पूर्ण केले जाईल आणि 'सेवेसाठी तत्पर भारत' अशी ओळख अधिकाधिक मजबूत केली जाईल असा विश्वास उद्योगक्षेत्राला वाटतो.
२००६ मध्ये व्यापार व उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या एसईपीसीचे अध्यक्ष श्री सुनील एच तलाटी यांनी सांगितले, "आम्हाला आनंद होत आहे की माननीय व्यापार व उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल यांनी सेवा व मर्चन्डाईज क्षेत्राविषयी जी भविष्यवाणी केली होती ती खरी ठरली आहे. ही क्षेत्रे वाढत आहेत आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतीय निर्यात २०२१-२२ च्या तुलनेत १३.८४% दराने वाढून ७७०.१८ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंतच्या नव्या यशोशिखरावर पोहोचेल असे अनुमान आहे. सरकार, एसईपीसी आणि उद्योगक्षेत्र फक्त उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नव्हे तर उत्तमोत्तम कामगिरी बजावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे आणि सेवा क्षेत्रासाठी हे वर्ष खूप यशस्वी ठरले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सुधारणा घडवून आणण्याचे आणि वृद्धी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे."
२००६ मध्ये व्यापार व उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या एसईपीसीचे उपाध्यक्ष श्री. करण राठोड यांनी सांगितले, "सेवा क्षेत्रात उदंड संधी उपलब्ध आहेत आणि आम्हाला खात्री आहे की सेवा क्षेत्र ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करेल. ही एसईपीसीने घेतलेली एक मोठी झेप आहे, एक नवा दृष्टिकोन आहे आणि सेवा क्षेत्रातील सर्व कार्यक्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ घडून यावी यासाठी आदर्श परिस्थितींवर भर देण्यासाठी कौन्सिल सर्वात पुढे असेल."
२००६ मध्ये व्यापार व उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या एसईपीसीचे महासंचालक डॉ अभय सिन्हा यांनी सांगितले, "सरकार आणि देशाला सेवा क्षेत्राकडून लक्षणीय योगदानाची अपेक्षा होती आणि एसईपीसीला घोषणा करताना आनंद होत आहे की आम्ही फक्त उद्दिष्टपूर्ती केली नाही तर त्याही पुढे झेप घेतली आहे. महामारीमुळे उत्पन्न झालेल्या स्थितीवर नियंत्रण मिळवत पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांनी पुन्हा उंच झेप घेतली आहे. मेडिकल व्हॅल्यू पर्यटन देखील आपली पकड मजबूत करत आहे आणि जागतिक बाजारपेठेत वेगाने पुढे जात आहे. आता आम्ही लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विकासात देखील साहाय्य करत आहोत. सेवा क्षेत्रामध्ये सर्वांना पुढे जाण्याच्या संधी मिळत राहतील हे सुनिश्चित करणे आमचे उद्दिष्ट आहे."