लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या ! सिटीझन फॉर कॉन्स्टिट्यूशन चे आवाहन

Santosh Gaikwad May 07, 2024 05:28 PM


मुंबई : लोकसभा निवडणूक ही पक्षा पक्षांमधील निवडणूक नसून, संविधान वाचविण्यासाठी ची निवडणूक आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया महविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यात यावे असे आवाहन सिटीजन फॉर कॉन्स्टिट्यूशन यांच्या व्यासपीठावरून समाजातील मान्यवरांनी केले.


येत्या २० तारखेला मुंबईत आणि महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक होत आहे त्याच पार्श्वभूमीवर सिटीजन फॉर कॉन्स्टिट्यूशन यांच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात एका पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत  ज्येष्ठ लेखक अर्जुन डांगळे, तिस्टा सेटलवाड, तुषार गांधी,   श्याम गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना तुषार गांधी म्हणाले की, आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर हात मिळवणी केलेली नाही. राष्ट्राला वाचविणे हाच अजेंडा आहे. संविधान वाचविण्याची आमची मोहीम आहे. गेल्या १० वर्षात भाजपने लोकशाही संपविण्याचे काम केले. त्यामुळे इंडिया महाविकास आघाडीला साथ देत आहोत. सत्तेसाठी नैतिकतेचे वस्त्रहरण सुरू आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपले हित ठरवणारी असल्याने महाविकस आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन गांधी यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ता तिस्टा सेटलवाड म्हणाल्या की, गणतंत्र संविधान वाचविण्यासाठी ची हि निवडणूक आहे
संविधान महत्व समजले पाहिजे. मोदी सरकारच्या काळात शेतकरी, कामगार, अल्पसंख्यांक यांच्यावर अन्याय झाला. पुन्हा मनुस्मृती आणण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे मतदारांनी जागे होऊन, संविधान टिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. 


लेखक विचारवंत अर्जुन डांगळे म्हणाले की, संविधान हे  दलितांच्या आरक्षणापूर्ती मर्यादित नाही. देशाचा पाया संविधानानुसार उभा आहे. आज देशासमोर मोठ संकट आहे. संविधानाचा पाया खिळखिळा करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे. संविधानातील मूल्य पायदळी तुडविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी सजग होऊन माहविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन डांगळे यांनी केले.

आंबेडकरी चळवळीचे नेते श्याम गायकवाड म्हणाले की,  आंबेडकरी जनतेचा मक्ता कोणी घेतलेला नाही. काही पक्ष भाजपला मदत करण्यासाठी उभ राहिले आहे मताचे विभाजन होणार नाही. ही लढाई अटीतटीची आहे, संविधान बदलण्याचे षडयंत्र आखणाऱ्यांचा निर्णायक पराभव होईल. आंबेडकरी जनतेची भूमिका निर्णायक ठरेल असा आशावाद गायकवाड यांनी व्यक्त केला.
-------