महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीमाई यांच्या जीवनावरील "सत्यशोधक" ५ जानेवारीला प्रदर्शित होणार

Santosh Gaikwad December 24, 2023 11:58 PM


पुणे : महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांची संघर्षमय गाथा रुपेरी पडद्यावर साकारणारा ‘सत्यशोधक‘ चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.   या चित्रपटा संदर्भातील एक कार्यक्रमावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये उपस्थिती लावली. यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.


‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे आता चित्रपट नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

यावेळी ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.  निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ, सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे, कार्यकारी निर्माते शिवा बागुल आणि महेश भारंबे, चित्रपटाचे संगीतकार अमितराज, गायिका वैशाली सामंत, गायिका आरती केळकर,  संदीप जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर म्हणाले, “‘सत्यशोधक’ हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट त्यांच्या कार्याची आणि संघर्षाची एक अनोखी झलक प्रेक्षकांना देईल. या चित्रपटाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.”