‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Santosh Gaikwad January 10, 2024 06:42 PM


मुंबई : क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपटाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या  या निर्णयाचे सर्वस्तरावरून कौतुक केले जात आहे. या निर्णयामुळे चित्रपटाच्या टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.

 सत्यशोधक हा मराठी चित्रपट  शिक्षण आणि सामाजिक समतेच्या मूल्यांना चालना देणारा आहे. या चित्रपटात  महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांचे जीवन, महिला आणि अस्पृश्य यांच्या शिक्षणासाठीचे त्यांचे अमुल्य योगदान व त्यांच्या परिश्रमाची कथा दाखविण्यात आलेली आहे. अशाप्रकारे जनमानसात योग्य तो सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आलेला आहे. 


चित्रपटाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रेरणादायी पैलुंचा विचार करता तो सर्वांना पाहता यावा यासाठी प्रोत्साहन म्हणून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चित्रपटगृहांनी या चित्रपटाच्या तिकीट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवाकर (एसजीएसटी) 30 एप्रिल, 2024 पर्यंत कालावधीत प्रेक्षकांकडून वसुल न करता स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरणा करण्यासाठी मंजूरी देण्यात आली.  तिकीट विक्री वरील शासन तिजोरीत भरणा केलेल्या राज्य वस्तू व सेवाकराचा (एसजीएसटी) परतावा देण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले आहे. महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने करमुक्त करण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.

 

'सत्यशोधक' हा चित्रपट देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत आहे. चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या १८ टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी ९ टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असतो. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची करसवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक कार्य भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन, छगन भुजबळ यांनी केले आहे.


 दरम्यान, समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत. सत्यशोधक या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे या सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित झाला.