सांगलीत  यापुढील निवडणुका वसंतदादा गट ताकदीने लढवणार; दादा घराण्यातील दोन्ही गटाचे अखेर मनोमिलन

SANTOSH SAKPAL April 07, 2023 11:50 PM

गेल्या अनेक वर्षापासून राजकीय संघर्षात असणाऱ्या दादा घराण्यातील दोन्ही गटाचे अखेर झाले मनोमिलन

सांगली : सांगली बाजार समिती संचालक मंडळाची निवडणुकीसह यापुढील सर्व निवडणुका वसंतदादा गटाच्यावतीने ताकदीने लढविण्याचा निर्णय शुक्रवारी वसंतदादा प्रेमींच्या  बैठकीत वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी जाहीर केला. या बैठकीला जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील याही उपस्थित होत्या.
गेल्या अनेक वर्षापासून राजकीय संघर्षात असणाऱ्या दादा घराण्यातील दोन्ही गटाचे अखेर मनोमिलन झाले आहे. गटबाजीमुळे नुकसान होत असल्याने मदन पाटील आणि दादा कुटुंबाने आता आपल्यातील वाद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांनी एकत्रित ताकदीने लढण्याचा निर्णय कार्यकर्त्याच्या बैठकीत जाहीर केला.


सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज दादा घराण्याच्या स्वाभिमानी कार्यकर्ते आणि इच्छुकांची बैठक दादा भवन येथे पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी गटबाजीमुळे दादा घराण्याचे कसे नुकसान झाले आहे याचा पाढाच वाचला. तसेच यापुढे दादा घराणे एकसंघ राहिले नाही तर मोठे नुकसान होण्याची भीतीही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मार्केट कमिटीच्या निवडणुका सुद्धा स्वतंत्र गटांनी लढवण्या ऐवजी एकत्रित लढण्याचा रेटाच कार्यकर्त्यांनी या बैठकीत लाऊन धरला. या बैठकीत कार्यकर्त्यांचा सुर पाहून विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांनी आम्ही एकत्रच आहोत आणि कोणतीही गटबाजी नसल्याचे जाहीर करत यापुढच्या सर्व निवडणुका या एकत्रित एक विचाराने आणि वसंतदादा गट नावाने लढवल्या जातील असे जाहीर केले. तसेच बाजार समिती निवडणूक अविरोध करण्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी सांगितले.