एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर ...., शिंदे गटाकडून फडणवीसांवर पलटवार !

Santosh Gaikwad 20, 3-08 08:49 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असतानाच आता एकमेकांना उत्तर प्रतिउत्तर देण्यात स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येते. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपने केसाने गळा कापू नये असे थेट वक्तव्य केल्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले  होते मात्र आमदार संजय शिरसाट यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर भाजपाच्या १०५ जणांना विरोधात बसावं लागलं असतं, अशा शब्दांत शिरसाट  शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गट आणि भाजपमध्ये वार पलटवार सुरू झाल्याचे दिसून येतय. 

महायुतीत जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली होती. “सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय”, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. कदम म्हणाले, “महाराष्ट्र भाजपातील काही लोक अतिशय घृणास्पद काम करत आहेत. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी महाराष्ट्रातल्या काही भाजपा नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवायला हवं असे कदम म्हणाले होते. 

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “रामदास कदम यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची त्यांची सवय आहे. टोकाचं बोलण्याचीदेखील त्यांना सवय आहे. ते बऱ्याचदा रागानेही बोलतात. परंतु, भाजपाने शिवसेनेचा नेहमीच सन्मान केला आहे. आम्ही ११५ आहोत तरीदेखील आमच्याबरोबर आलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्याबरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे असे प्रतिउत्तर फडणवीस यांनी दिलं होतं. 

दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाने पुन्हा पलटवार केला आहे.  शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, भाजपाचे १०५ आमदार आहेत हे खरं आहे, त्यांच्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत हेदेखील खरं आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर त्या १०५ जणांना विरोधात बसावं लागलं असतं, हेदेखील तितकंच खरं आहे. त्यांचे १०५ आमदार विरोधात बसले होते. शिंदेंनी उठाव केला नसता तर त्या १०५ जणांना विरोधात तसंच बसावं लागलं असतं. एकनाथ शिंदेंमुळे ते सत्तेत आहेत आणि त्यांच्यामुळे एकनाथ शिंदे सत्तेत आहेत. दोन्ही बाजू खऱ्या आहेत. त्यामुळे कोणीही कोणाचंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असे शिरसाट म्हणाले.