मराठा समाज अस्वस्थ; मंत्री नाचण्यात दंग : राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Santosh Gaikwad February 21, 2024 11:32 PM


मुंबई, दि. २१ः 
मराठा आरक्षण संदर्भातील विधेयकावर मराठा समाज अस्वस्थ आहे. मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. सरकारचे मंत्री मात्र नाचण्यात दंग आहेत. नाचून हा प्रश्न सुटणार आहे का, असा संतप्त सवाल शिवसेना (ठाकरे) संजय राऊत यांनी उपस्थित करत सरकारवर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, पंजाबमधील शेतकरी आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या आंदोलनावरून समाचार घेतला.  

राज्य सरकारने १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयकाचा मसूदा विशेष अधिवेशनात मंजूर केला. मराठ्यांना त्यानुसार सिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र आरक्षण दिले जाणार आहे. मराठा समाजाला हा निर्णय मान्य नाही. प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता आहे. सरकारने एकप्रकारे समाजाची फसवणूक केली, अशी भावना आहे. स्वतंत्र आरक्षण देणार असल्याचे सांगत सरकारने मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. देशात भाजप फसवाफसवीचे खेळ सुरू आहेत. मराठा आरक्षणापासून ते चंडीगड महापौर निवडणुकीपर्यंत हा पक्ष फसवाफसवीच्या पायावर उभा आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. सरकारमधील मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील वरातीप्रमाणे रस्त्यावर नाचत आहेत. मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे, मराठा समाज अस्वस्थ आहे, असे नाचून प्रश्न सुटणार का, असा प्रश्न राऊतांनी विचारला.


सरकारच्या तिजोरीत ठणठणाट 


देशातील शेतकरी आंदोलनावरून राऊतांनी हल्लाबोल केला. देशातील विविध राज्यात शेतकऱ्यांची वेगवेगळी उत्पादने आहेत. सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. परंतु, सीमापार केल्यास गोळ्या झाडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. शेतकऱ्यांचे मुडदे पडले तरी चालतील, परंतु शेतकऱ्यांना एमएसपी देण्यासाठी सरकार तिजोरीत हात घालणार नाही. इलेक्ट्रॉल बाँडच्या रूपाने सरकारकडे कोट्यवधी रूपये आहेत. पंतप्रधान फंडातून हजारो कोटी अदानींना दिले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी सव्वा दोन कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडे कोणतीही तरतूद नाही, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात ही सरकारकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला