महाराष्ट्रात एक नव्हे तीन जनरल डायर : संजय राऊत

Santosh Gaikwad September 04, 2023 05:42 PM


मुंबई, दि. ४ : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात जनरल डायरचे राज्य असून एक नव्हे तर तीन - तीन डायर आहेत. त्याच मानसिकतेतून राज्याचा कारभार सध्या सुरु आहे, असा जोरदार हल्लाबोल  राऊत यांनी शिंदे फडणवीस आणि पवार सरकारवर केला.  मंत्रालयातून फोन गेल्याने लाठीमार करण्यात आला. हा फोन कोणाचा आणि कुठल्या केबिनमधून गेला. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप राऊत यांनी केला.

 

 मराठा आंदोलन चिरडण्यासाठी लाठी मार करण्यात आली. राज्य सरकार यात दोषी आहे. सरकारच्या आदेशाशिवाय लाठीमार होऊ शकत नाही. लाठीमार करण्यासाठी तो अदृश्य फोन कोणाचा होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री की गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून होता याचा खुलासा व्हावा. या प्रकरणात पोलिसांना दोष देऊ नका. सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचा यात बळी घेऊ नका. हा संवेदनशील विषय आहे, असे राऊत म्हणाले. तसेच येथे होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रमात आंदोलकांचा अडथळा नको. त्यामुळे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीमार केल्याचा आरोप राऊत यांनी केला.


लोकायुक्तांच्या अधिकाराबाबतच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला. केंद्र सरकारने दिल्ली ताब्यात देण्यासाठी संसदेत घटनात्मक दुरुस्ती केली. नवीन विधेयक मांडून कायदा केला. विरोधकांना मात्र त्यावर बोलू दिले नाही. केंद्र सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे, असा आरोप राऊतांनी केला. तसेच ऐन गणेशोत्सवात संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आणि ओबीसी समाजातील आर्थिक दुर्बळ घटकांवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. तसेच दिल्लीप्रमाणे मराठा आरक्षण संदर्भात काही घटना दुरुस्ती करून न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला.