सावरकरांचे विचार पुरोगामी, संघाला सावरकरांचं हिंदुत्व मान्य नाही; संजय राऊत यांनी केली भाजप आणि संघाची पोलखोल

Santosh Sakpal April 02, 2023 06:35 PM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपच्या दुखऱ्या नसवर बोट ठेवलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सावरकरांचं हिंदुत्व मान्य नव्हतं, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. त्याचवेळी संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघाची पोलखोल केली आहे. संघावर आरोप करताना सावरकर कसे पुरोगामी होते. तसेच सावरकर विज्ञाननिष्ठ कसे होते आणि संघाला त्यांच्या विचाराशी कसे काहीच घेणंदेणं नाही, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

सावरकर आणि संघाचे विचार भिन्न आहेत. दोघांचे विचार वेगवेगळे आहेत. संघ आणि सावरकरांच्या विचारात मेळ नाही. संघ सावरकरांचे हिंदुत्व मानत नाही. मग सावरकरांचे विचार कसे नेणार? आम्ही सावरकरांचं हिंदु्त्व स्वीकारलं. सावरकरांना शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं. बाळासाहेबांनीच सावरकरांचे विचार पुढे नेले, असं सांगतानाच सावरकर यात्रा ही राजकीय अजेंड्यासाठीच काढली जात आहे. संभाजीनगरमधील दंगल हा राजकीय अजेंडाच होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सावरकरांचा विचार मान्य आहे काय?

सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद स्वीकारला. भाजप म्हणते, गाय ही गोमाता आहे. तर सावरकरांना ते मान्य नाही. गाय ही उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर गायीचं गोमांस खायला हरकत नाही,हा सावरकरांचा विचार होता. हा विचार भाजपला मान्य आहे का?, असा थेट सवालही त्यांनी केला.