*रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव*

Santosh Sakpal April 24, 2025 07:31 PM


मुंबई दि. २४ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन होणार आहे. 

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या महोत्सवात शुक्रवार दिनांक २५ एप्रिल, २०२५ रोजी पहिल्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. तर याच दिवशी पं. उस्ताद शाहिद परवेझ यांचाही शास्त्रीय गायनाचा सांस्कृतिक कार्यकम सादर होणार आहे. शनिवार दिनांक २६ एप्रिल, २०२५ रोजी दुसऱ्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता डॉ.भरत बलवल्ली तसेच विदुषी मंजुषा पाटील यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यकम सादर होईल. रविवार दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांचे गायन  आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं.उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

उपरोक्त शास्त्रीय संगीत महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे. विनामुल्य प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर-प्रभादेवी, छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर - दादर आणि यशवंत नाट्य मंदिर - माटुंगा येथे उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी  आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.