रोझरी कॅरम स्पर्धेत आर्यन, रीदा विजेते

Santosh Sakpal July 21, 2023 11:43 PM

MUMBAI : रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड रोड कॅरम संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात आर्यन डेंगळेने आणि मुलींच्या गटात रीदा डालियाने विजेतेपद पटकाविले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्यीत कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आर्यन डेंगळेने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत ईशान शिंदेचे आव्हान ९-३ असे संपुष्टात आणले. प्रारंभ उत्तम करूनही ईशान शिंदेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलींमध्ये अजिंक्यपदाला गवसणी घालतांना रीदा डालियाने सर्व बोर्डावर वर्चस्व मिळवीत रीदा खानचा १२-० असा सहज पराभव केला.

    उपांत्य फेरीच्या शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ईशान शिंदेने प्रथमेश बोरीचाला ८-७ असे चकविले. दुसऱ्या सामन्यात मात्र आर्यन डेंगळेने नैतीक राठोडला १०-० असे हरवून आरामात अंतिम फेरी गाठली. मुलींच्या उपांत्य फेरीत रीदा डालियाने अंजेल प्रजापतीवर ८-५ असा तर रीदा खानने झीक्रा मुकादमवर १०-० असा विजय मिळविला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांच्या पुढाकारांमुळे शालेय खेळाडूंना चँम्पियन बोर्डसह कॅरम साहित्य तसेच पंच मार्गदर्शन मोफत उपलब्ध झाल्यामुळे स्पर्धकांना दर्जेदार खेळ दाखविण्याची संधी प्राप्त झाली. शालेय खेळाडूंमध्ये कॅरम खेळाची प्राथमिक गुणवत्ता दिसून आल्यामुळे प्रिन्सिपल सिस्टर विजया चलील यांनी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीला आपल्या शाळेतील मुलांमुलींसाठी विनाशुल्क कॅरम प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यास सांगितले.