लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळेंवर जबाबदारी : शरद पवार

Santosh Gaikwad June 10, 2023 07:51 PM


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीच्या घोषणनंतर पक्षाचे सर्वेसर्वा  शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले की,  सुप्रिया सुळे यांची निवड हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. गेल्या एक महिन्यापासून याविषयीची चर्चा पक्षातील सहकाऱ्यांमध्ये सुरु होती. लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं असे  पवार यांनी सांगितलं.  


विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, अजित पवार नाराज आहेत हे असत्य आहे. अजित पवार यांच्यावर आधीच अनेक जबाबदाऱ्या आहेत. ते विधिंमंडळ पक्षाचे नेते आहेत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. जयंत पाटील यांच्यावर देखील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे उपलब्ध होते. त्यांना पक्षवाढीसाठी वेळ देणं शक्य आहे. अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे यांचे नाव सुचविले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या वृत्ताला अर्थ नाही, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 


दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले गेले या प्रश्नावर बोलताना  पवार म्हणाले की, या देशाची रचना पाहिल्यानंतर, तीन, चार, पाच जे महत्त्वाची राज्य आहेत, सर्व राज्याची जबाबदारी एका व्यक्तीवर दिली तर आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही विविध सहकाऱ्यांना जबाबदारी देवून कामं वाटून घेतले आहेत जेणेकरुन आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू  असं  पवार यांनी सांगितलं.


क्रांतीकारी निर्णय घेतला की बोलू 

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निर्देश दिले आहेत. यानंतर राहुल नार्वेकरांनी “मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन”, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. याबाबत  शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.   पवार म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार आहेत हे मला माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी होतील हे सांगता येणार नाही. विधानसभा क्षेत्रात मी जास्त लक्ष घालत नाही. राहुल नार्वेकरांनी क्रांतीकारी निर्णय घेऊ असं वक्तव्य केल्याचं मी वाचलं. त्यामुळे ते काय क्रांतीकारी निर्णय घेतात याची आम्ही वाट पाहतो आहे. त्यांनी क्रांतीकारी निर्णय घेतला की, आम्ही त्यावर बोलू, असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं.


विरोधी पक्षाच्या बैठकीत नवी दिशा मिळेल ..


येत्या २३ जूनला पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक  होणार आहे त्या बैठकीविषयी बोलताना पवार यांनी सांगितले की,  त्या बैठकीला आम्ही जाणार आहोत. भाजप विरोधात आपण कसं लढू शकतो याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.   जिथे भाजपची शक्ती जास्त आहे तिथे इतर विरोधी पक्षांकडून एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करावा असा मुद्दा आहे. याबाबत बैठकीत चर्चा होईल. पाटण्याच्या बैठकीत नवी दिशा मिळेल असा आशवाद शरद पवार यांनी व्यक्त केला.