सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार : -राज्यपाल रमेश बैस

Santosh Gaikwad January 27, 2024 10:15 AM


 प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभ


   मुंबई - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक,  प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील  शिवाजी पार्कवर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल  बैस यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले,  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,  राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना तसेच समाजसुधारकांना अभिवादन करून राज्यपाल श्री. बैस यांनी महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात करीत असलेल्या विकासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशातील सर्वाधिक लांबीच्या 'अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' या सागरी पुलासह 35 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तीन लाख 53 हजार 675 कोटींहून अधिक रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.




 मराठा आरक्षणासाठी समिती


  मराठा आरक्षणाबाबत माहिती देताना न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याचे राज्यपाल  बैस यांनी सांगितले. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात मे 2023 मध्ये उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह पीटिशन) दाखल केली असून शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 


संचलनात विविध पथकांचा सहभाग 

यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, गोवा पोलीस पथक, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथक,  बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क पथक, वनरक्षक दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पथक, राष्ट्रीय सेवा योजना मुले आणि मुली, सी कॅटेट कोर पथक मुली आणि मुले, रोड सेफ्टी पेट्रोल विविध शाळांमधील मुले आणि मुली, भारत स्काऊट आणि गाईड महानगरपालिका शाळांमधील मुले व मुलींचे पथक, पोलीस ब्रास बॅण्ड, पाइप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक, महिला निर्भया वाहन पथक, नौदलाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने आदींनी सहभाग घेतला.

जनहिताचे संदेश देणारे चित्ररथ


राज्य शासनाच्या विविध विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह  सहभाग घेतला. यामध्ये नगरविकास (एम एम आर डी ए), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, मृद आणि जलसंधारण,   झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण,  ऊर्जा, ग्रामविकास, अल्पसंख्याक विकास, आदिवासी विकास, सार्वजनिक आरोग्य,  वन,  कामगार, इतर मागास बहुजन कल्याण, गृह (वाहतूक नियंत्रण शाखा), पाणी पुरवठा व स्वच्छता, सांस्कृतिक कार्य, कृषी, पर्यटन विभाग यांचा समावेश होता.