*सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल, तर मुश्रीफांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी - विजय वडेट्टीवार*

Santosh Gaikwad October 07, 2023 06:10 PM

  

मुंबई : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ऑडिटरचा जामीन अर्ज नाकारताना त्यांच्यावर पीएमएलए कोर्टाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे.  वास्तविक पाहता या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे कोर्टाने अधोरेखित केले आहे. या अनुषंगाने मंत्रिमंडळात मुश्रीफांना एक मिनीटसुद्धा ठेवू नये. सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल, तर मुश्रीफांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली असून, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही   वडेट्टीवार यांनी दिला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 


 वडेट्टीवार म्हणाले , पुढच्या १०-१२ दिवसांत या मंत्रिमंडळातील नऊ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. तरी त्यांना शुद्ध करून, त्यांच्यावर गौमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला. पण हे दाग जरा जिद्दी आहेत, निघतच नाहीत अशी या मंत्र्याची स्थिती झाली आहे.हे नऊ मंत्री कोण ? याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मी या नऊ मंत्र्यांची नावे सांगू शकत नाही पण मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात नसतील हे मी तुम्हला खात्रीपुर्वक सांगतो असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.तसेच या नेत्यांवर आम्ही आरोप केलेले नाहीत, या मंत्र्यांवर भाजप नेत्यांनीच लावलेले आरोप आहेत. त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या तक्रारी आहेत असेही वडेट्टीवार म्हणाले.


*अजित पवारांना राजकीय आजार* 


आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, या सोळा आमदारांवर कारवाई होणारच. त्यांच्यावर कारवाई होणार आहे म्हणूनच  सुनावणीसाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप करत   कायद्याच्या चौकटीतून कोणीही त्यांना वाचवू शकणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितले. अजित दादाच्या नाराजीवर बोलताना  वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार नेहमीच नाराज असतात त्त्यांची ती परंपरा आहे. नाराजीतून आपलं वर्चस्व दादा कायम ठेवतात महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातही त्यांनी तेच केलं.. कधी नॉट रिचेबल,तर  कधी त्यांना ताप  यायचा त्यांना हा राजकीय आजार असल्याचा टोला त्यांनी लगावला. बावनकुळे कधी  अजितदादा मुख्यमंत्री  म्हणतात  तर  कधी शिंदेच मुख्यमंत्री राहणार म्हणतात ..कधी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे  म्हणतात..  त्यांच्याकडे  आम्ही एक नावांची यादी  देणार असुन आलटून पालटून सगळ्यांचं नाव घ्या म्हणजे सगळ्यांचे समाधान होईल असा मिश्किल टोला  वडेट्टीवार यांनी लगावला. शासकीय रुग्णालयात औषध तुटवड्यामुळे रूगणांचा मृत्यू होत असल्याने सरकारवर आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यावर  ३०२ चा गुन्हा नोंदवला पाहिजे असं  वडेट्टीवार म्हणाले.