शुभम मुंबईला पावला! गुजरातच्या RCB वरील विजयानं मुंबई प्ले ऑफमध्ये दाखल

Santosh Sakpal May 22, 2023 08:42 AM

Royal Challengers Bangalore vs Gujrat Titans Match Update : आयपीएल २०२३ चा ७० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आरसीबीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत २० षटकात ५ विकेट्स गमावत १९७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करत या सामन्यातही शतकी खेळी केली. परंतु, विजयासाठी या धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी कमाल केली. विजय शंकर आणि शुबमन गिलने चौफेर फटकेबाजी करत गुजरातला या सामन्यात विजय मिळवून दिला. शुबमन गिलने ५२ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्यामुळे गुजरातने ४ विकेट्स गमावत १९८ धावा करून आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली असून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे.

गुजरातसाठी सलामीला उतरलेल्या ऋद्धीमान साहाला या सामन्यात धावांता सूर गवसला नाही. साहा १२ धावांवर असताना मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र विजय शंकरने धावांचा पाऊस पाडत अर्धशतकी खेळी केली. शंकरने ३५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ५३ धावांची खेळी साकारली. शंकर विजयकुमार विषकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि गुजरातला मोठा धक्का बसला. बंगळुरुसाठी सिराज, विजयकुमार आणि हर्षल पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आरसीबीसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिसने १९ चेंडूत २८ धावा केल्या. नूर अहमदच्या फिरकीवर फाफ बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. विराटने पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी केली अन् गुजरातविरोधातही शतकी खेळी करत इतिहास रचला. विराट ६१ चेंडूत १०१ धावा करून नाबाद राहिला. ग्लेन मॅक्सवेल ११ धावांवर असताना राशिद खानच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. माहिपाल लोमरोरलाही धावांचा सूर गवसला नाही. तो फक्त १ धाव करून नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण ब्रेसवेलने गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत २६ धावा केल्या. तो शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर अनुज रावत १५ चेंडूत २३ धावा करत नाबाद राहिला.