मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवावे; दलित मराठा ऐक्यासाठी पुढे यावे - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

Santosh Gaikwad February 16, 2024 07:53 PM


मुंबई दि.16 - मराठा आरक्षण लढ्याचे क्रांतियोद्धे मनोज जरांगे यांचा जीव लाखो मराठा तरुणांना नवजीवन देणारा जीव आहे.त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरका मराठा समाजाच्या पाठीशी आहे.त्यामुळे मनोज जरांगे यांनी तातडीने उपोषण थांबवावे त्यांची मराठा समाजाला ;महाराष्ट्राला गरज आहे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री .रामदास आठवले यांनी केले. 


मनोज जरांगे यांनी निवडणूक लढण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे असे पत्रकारांनी आज विचारल्या नंतर रामदास आठवले यांनी मनोज जरांगे यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले. मनोज जरांगे यांनी निवडणुकीचे राजकारण करावे की करू नये हा त्यांनी निर्णय घ्यावा मात्र राज्यात  दलित मराठा समाजाचे ऐक्य करण्यासाठी मनोज जरांगे यांची महाराष्ट्राला गरज आहे.


 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना असणारा रिपब्लिकन पक्ष हा राजकारणापेक्षा सामाजिक सांस्कृतिक भेदभावाची लढाई लढणारा पक्ष आहे.या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत पुढे येऊन मनोज जरांगे यांनी एक आदर्श उभा करावा. रिपब्लिकन पक्षात येऊन भेदभाव निर्मूलनाच्या लढाईला बळ देऊन राज्यात नवा इतिहास घडवावा. दलित मराठा ऐक्यातून महाराष्ट्रात नवा इतिहास घडेल असे आवाहन आज .रामदास आठवले यांनी मनोज जरांगे यांना केले.

 मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणी नुसार सगेसोयरे यांना आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे.मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित केले आहे. सरकार मराठा आरक्षण साठी अनुकूल आहे. आम्ही तर सुरुवातीपासून मराठा  समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला पाठिंबा दिला आहे.आम्हीही अनेक आंदोलने केली आहेत. आंदोलनात सबुरीने घेतले पाहिजे. आम्ही 17 वर्षे नामांतर लढा नेटाने लढलो आणि जिंकलो. त्यामुळे मनोज जरांगे यांनी थोडे सबुरीने घेतले पाहिजे. स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी.मराठा आरक्षण मिळविण्यासाठी त्याच्या अंमलबाजवणी साठी आणि पुढे दलित मराठा ऐक्यासाठी आपण मजबूत ताकदीने उभे राहिले पाहिजे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन  आठवले यांनी केले.