सत्तेत असताना का विरोध केला नाही, राज ठाकरे यांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

Santosh Gaikwad May 04, 2024 09:58 PM


कणकवली  : कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत.  २०१४ ते २०१९  या काळात तुम्ही त्यांच्या सोबत होतात. तेव्हा का विरोध केला नाही. कोकणात प्रकल्प आले तर स्फोट होईल म्हणणाऱ्या माहिती नाही का ? की अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार" असा जोरदार हल्ला मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला. रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

  नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील पटांगणात उपस्थित होते. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  


राज ठाकरे म्हणाले की, आधी तुम्ही त्यांच्या सोबत सत्तेत होते. तेव्हा मुख्यमंत्री असताना साडेसात वर्ष सत्तेत असताना तुम्ही विरोध का नाही केला. तेव्हा राज्याबाहेर उद्योगधंदे का जाऊ दिलेत ? जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध केला. कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही. नाणारला विरोध झाला. लोकांना भडकवण्यात आले. नाणार होणार तिथे जमीन आली कुठून ?अनेक दलालांनी जमीन विकत घेतली. मुख्यमंत्री झाल्यावर यांनी (उद्धव ठाकरे) म्हटले बारसुला हलवा. आता जमीन कशी सापडली. यांच्याच लोकांनी या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तुमच्याकडे १० रुपयाला घ्यायची आणि सरकारकडून २०० रुपये घ्यायचे. हा सगळे प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.  


 राज ठाकरे म्हणाले की, मला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून मी माझी भूमिका बदलली नाही.   गुढीपाडव्याच्या सभेत मी पाठिंबा का दिला हे सांगितलं होतं. मला एखादी गोष्ट पटली तर पटली, नाही पटली तर शेवटपर्यंत नाही पटणार. २०१४ते २०१९ दरम्यान ज्या गोष्टी नाही पटल्या त्यावर मी जाहीर विरोध केला. आज ही त्या गोष्टी पटत नाही. कलम ३७० रद्द करण्याबाबत मी कधीपासून ऐकत होतो. पण मोदींनी ते कलम रद्द केलं. ते कलम मोदी सरकारमुळेच रद्द झाले हे तुम्हाला मान्य करावेच लागेल.

बाबरीचा विषय जेव्हा आला तेव्हा देशभरातून कारसेवक तेथे गेले. मुलायम सरकारने अनेक कारसेवकांना गोळ्या घातल्या होत्या. ती घटना अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. न्यायालय आणि मोदी सरकारमुळेच राम मंदिर झाले. त्यामुळे कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. त्यामुळे माझा हेतू स्पष्ट होता आणि उद्देश पारदर्शक होता. गोष्ट हिरावून घेतली म्हणून मला आग लागली, असे म्हणत राज ठाकरे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.