असे आंदोलन करा, सरकार हलले पाहिजे.., मनसैनिकांना राज आदेश !

Santosh Gaikwad August 16, 2023 04:36 PM


पनवेल : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आज पनवेलमध्ये निर्धार मेळावा पार पडला. गेल्या १६ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि रस्त्यांवरील खड्डयांमुळे कोकणवासियांना होणारा त्रास यारून राज ठाकरेंनी सरकारची खरडपट्टी काढीत, भाजपसह अजित पवार, उध्दव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाही पण आंदोलन असे झाले पाहिजे की सरकार हलले पाहिजे. सरकारला अशा प्रकारचे आंदोलन झाले होते अशी भीती वाटली पाहिजे जिथे गरज लागेल तिथे मला बोलावा असा आदेश राज ठाकरेंनी कार्यकत्यांना दिला. त्यामुळे येत्या काळात खड्डयांवरून मनसे कशाप्रकारचे आंदोलन करते याकडे लक्ष वेधले आहे.  


 समृध्दी महामार्ग चार वर्षात होतो. अमेरिकेची एम्पायर इस्टेट बिल्डींग चौदा महिन्यात बांधली. मग इकडे रस्त्यांना १४ १४ वर्षे लागतात कशी ? मग कोकणातले आमदार खासदार काय करतात. कोण बोलतोय गडकरींशी काय करतात हे लोक ? असा सवाल करत राज ठाकरेंनी खड्डयांवरून आंदोलन करण्याचे आदेश कार्यकत्यांना दिले. पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत तुम्हाला काम करावे लागणार आहे. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाही पण आंदोलन असे झाले पाहिजे की सरकार हलले पाहिजे. लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे. तुमचे कोकणावर लक्ष असले पाहिजे. कोण जमिनी पळवतेय ते पहा कोकणात उद्योग आले पाहिजे पण कोकणाचे सौंदर्य राखून आले पाहिजे असे आदेश वजा सुचना राज ठाकरेंनी कार्यकत्यांना दिल्या. 


राज ठाकरे म्हणाले की, चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा यान महाराष्ट्र सोडलं असतं तर खर्चही वाचला असता असा खोचक टोला राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या अवस्थेवरुन लगावला आहे. महामार्गाच्या कामाला २००७ साली सुरुवात झाली होती. मात्र १६ वर्ष झाले हे काम सुरुच आहे. त्यामुळे कोकणात जात असलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.  महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची हीच परिस्थिती आहे. हे खड्डे आज पडले नाही. अनेक सरकार आले गेले. एवढी सरकारं आले नंतर देखील त्याच पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मतदान कसे करता, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.   


*'मुंबई-गोवा हायवेवर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च'*


 मुंबई गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रूपये खर्च झाला आहे पण अजूनही रस्ता झालेला नाही. बाकीच्यांच्या तुंबडया भरल्या. नितीन गडकरी म्हणाले कंत्राटदार पळून गेले. काही कोर्टात गेले. यामागे कोणाचं काम सुरू नाही. नाणार प्रकल्प रद्द होताच बारसू प्रकल्प आलं पाच पाच हजार एकर कोणी विकत घेतली कोणाच्या नावावर कोण काम करतोय आपला बांधव चिरीमिरीसाठी विकून मोकळा होता. आपल्याकडेच कुंपण शेत खातय. आपल्या लोकांना फसवून दुस-यांच्या घशात जमीन घालताहेत. पुढील २५ वर्ष नीट रस्ता झाला तर पैसे खायचे कसे, म्हणून खराब रस्ते बनतात. टेंडर, टक्केवारी सुरु आहे. 2024 पर्यंत रस्ता पूर्ण होईल सांगितले असले तरी पुढे काय, याचा विचार केला आहे का," असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.


*आमदार न फोडता पक्ष उभा करायला शिका, भाजपला प्रतिउत्तर*


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या एका दौऱ्यात टोलनाक्याची तोडफोड झाल्यावर भाजपा नेत्यांनी सडकून टीका केली होती.  मनसेने रस्ते बांधायला आणि टोलनाके उभे करायलाही शिकावं असं म्हणत हल्लाबोल केला होता. आमच्यावर टीका करणाऱ्या भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं असं जोरदार प्रतिउत्तर राज ठाकरेंनी दिलं. 


*अजित पवारांची मिमिक्री ...*  

 

राज ठाकरेंनी भाजपसह अजित पवार यांची मिमिक्री करीत त्यांचाही समाचार घेतला. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या. मग त्यांना आतमध्ये आणयचं. मग ते लोक गाडीमध्ये झोपून जाणार. निर्लज्जपणाचा कळस महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असे आरोप मोदींनी केले होते. मग हे सगळेजण टुणकन इथे (भाजपाबरोबर) आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार. आत काय काय असतं? जाऊ नको. आपण हवं तर इथे जाऊ पण तिथे नको, अशा शब्दांत राज ठाकरेंनी भुजबळांवर देखील निशाणा साधला.


*खोक्याच्या नावाने ओरडणाऱ्यांकडे कंटेनर ..*


राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंनाही खोचक टोला लगावला. खोके खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत. त्यांनी कोविड पण सोडला नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. प्रत्येक वेळी बाळासाहेबांचे नाव पुढे करतात आणि आम्ही लगेच भावनिक होत असंही राज ठाकरे म्हणाले.