ठाकरे - शिंदेच्या भेटीने चर्चांना उधाण

Santosh Gaikwad July 07, 2023 08:55 PM


मुंबई : राज्यातील राजकीय भूकंपांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा रंगली असतानाच, मनसे नेते अभिजित पानसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर या चर्चांना बळं मिळालं होतं, त्यातच शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.


गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या घटना समोर येत आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एका गट शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसांपासून मनसे- ठाकरे गट युती होणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यातच ठाकरे- शिंदेंच्या भेटीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून यामागे काही नव्या राजकीय समिकरणांचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.  


दरम्यान शेतकरी आणि बीडीडी चाळीच्या प्रश्नांबाबत दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे, यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश दिले. याआधी २० एप्रिल २०२३ ला ही राज ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, तेव्हाही नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीचा मुद्दा चर्चीला गेला होता. याशिवाय आजच्या भेटीत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या प्रश्नांवरही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे.


----------