पावसाचा 'रेड अलर्ट' : मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Santosh Gaikwad July 26, 2023 10:15 PM


मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या  इशाऱ्यानंतर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व शाळांना उद्या  (गुरूवार दि २७ जूलै)  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून आजही पावसाने जोरदार बॅटींग सुरू असल्याने अनेक सखल भागांमध्ये यामुळे पाणी साचलं आहे. मुंबई पावसाची स्थिती उद्याही अशीच कायम राहण्याचा अंदाज आहे.  भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.  या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 


 पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट


महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात उद्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, पुणे, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अलर्ट आज आणि उद्यासाठी असणार आहे. तर 28, 29 जुलैसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.