राहुल नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक : पोलीस ठाण्यात तक्रार

Santosh Gaikwad March 05, 2024 04:07 PM


मुंबई : एकीकडे  मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्या शिक्के चे प्रकरण ताजे असतानाच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करण्यात आल्याने  खळबळ उडाली आहे. नार्वेकर यांच्या मेलआयडीवरून राज्यपाल रमेश बैस यांना मेल पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी मरिन लाइन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
 
अधिक माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल  हॅक करण्यात आला आहे.  जे आमदार सभागृहात नीट वागत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी, असा मेल नार्वेकरांच्या ईमेलवरून राज्यपालांना  करण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्या शिक्के घेतल्याची घटना समोर आली होती. अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून व्यक्तिगत मदतीसाठीच्या निवेदांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या घेण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री शिंदेंच्या बनावट सह्यांची सुमारे बारा निवेदनं समोर आली होती. मुख्यमंत्री सचिवालयाने यासंदर्भात नरिमन पॉईंट पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.