राहुल नार्वेकरांनी ठाकरे, सरोदेंचे मुद्दे खोडून काढले !

Santosh Gaikwad January 16, 2024 11:12 PM

 

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेला निकाल कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरेंसह नेत्यांचया निवडीचे व्हिडीओ आणि कागदपत्र दाखवण्यात आली मात्र यानंतर नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे मुद्दे खोडून काढले.यावेळी निवडणूक आयोगामधील शिवसेनेची सर्व कागदपत्र सादर करत ती वाचून दाखवली.


 नार्वेकर पत्रकार परिषदेत म्हणाले,  शिवसेनेनं सातत्यानं माझ्यावर आरोप केला की, नार्वेकारांनी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सच्या बाहेर जाऊन निकाल दिला. पण मी असं काहीही केलंल नाही. कारण पहिला मुद्दा असा होता की, असं सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टानं २०२२ रोजी अजय चौधरी यांची निवड योग्य ठरवली होती. तसेच मी ३ जुलै २०२२ला भरत गोगावलेंचा व्हिप म्हणून आणि एकनाथ शिंदेंच्या गटनेता म्हणून नियुक्तीला अधिकृत ओळख दिली हे चुकीचं आहे. पण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अन् त्यातील काही पानं वाचली तर त्यात नेमकं काय म्हटलंय हे स्पष्ट होईल.


पण सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना सांगितलं की, मूळ राजकीय पक्ष कुठला हे आधी निश्चित करा. त्यानंतर मूळ राजकीय पक्ष जाहीर करा आणि त्यावर प्रतोदला मान्यता द्या आणि त्यानुसार निर्णय द्या. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं हे कधीच सांगितलेलं नाही की, गोगावलेंची निवड चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड योग्य आहे. त्यामुळं मी दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या गाईडलाईन प्रमाणं निर्णय दिला आहे.


त्यानंतर सुप्रीम कोर्टानं मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी तीन निकष सांगितले. माझ्या निकालात हे तिनही निकष मी स्पष्टपणे माझ्या निकालात वाचून दाखवले. माझ्याविरोधात वारंवार सांगितलं जात आहे की, अध्यक्षांनी १९९९ची घटना योग्य ठरवली आणि २०१८ची घटना चुकीची ठरवली. पण सुप्रीम कोर्टानं आदेशात म्हटलंय की, ज्यावेळी मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवताना जर तुम्ही संविधानाचा विचार करत असाल तर दोन्ही गटांनी दोन वेगळ्या घटनांचा आधार घेतला तर आपण हे वाद टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडं जी घटना सादर केली त्याचाच आधार घ्यावा. यावर निवडणूक आयोगाला मी पत्र पाठवून ही विनंती केली की, माझ्याकडं अपात्रतेच्या याचिका आल्या आहेत यामध्ये १०व्या सुचीनुसार निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी मला पक्षाच्या घटनेची प्रत हवी आहे. जी निवडणूक आयोगाकडं दिली आहे. त्याचबरोबर घटनाबदलाचे सर्व कागदपत्रे असाही मी विशेषतः उल्लेख केला होता. लवकरात लवकर हे आम्हाला स्पीड पोस्टानं हे पाठवावं.


यावर निवडणूक आयोगानं उत्तरादाखल शिवसेनेची १९९९ ची घटना माझ्याकडं पाठवली. आमच्या रेकॉर्डवर जी आहे त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतो, असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं. मी त्यांना सुधारणेबाबतची प्रतही मागितली होती. पण याबाबतचा निर्णय आमच्या आदेशात असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यांच्या आदेशात असं म्हटलं की, २०१८ मधील शिवसेनेच्या घटनेतील सुधारणा आमच्याकडं उपलब्ध नाही.


त्यानंतर वारंवार हे सांगितलं जात आहे की, आम्ही २०१३ च्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला होता. तसेच याबाबतच पत्रही निवडणूक आयोगाला दिलं होतं. पण या पत्रात २०१३ मध्ये निवडणूक आयोगाला आम्ही घटनाबदलाची प्रत देत आहोत, याचा उल्लेख नाही. फक्त जी निवडणूक झाली त्याचा निकाल दिल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली. काय घटनादुरुस्ती झाली याचा उल्लेख त्यांनी यात केलेला नाही.


त्यानंतर शिवसेनेनं २०१८बाबत सांगितलं की, आम्ही याचे पुरावे निवडणूक आयोगाला दिले आहेत. यासाठी त्यांचे नेते ४ एप्रिलचं पत्र कायम दाखवत असतात. यातही हेच लिहिलंय आहे की, निवडणुकीचा निकाल त्यांनी निवडणूक आयोगाकडं दिलं आहे, पण घटनादुरुस्तीबाबत उल्लेख केलेला नाही.


यानंतर पक्षाच्या नेतृत्वाबद्दल आणि संघटनात्मक रचनेबाबत सांगतो की, २०१८ मध्ये शिवसेनेनं जी संघटनात्मक रचना निवडणूक आयोगाकडं दिली तीच रचना मी ग्राह्य धरली आहे. कोर्टानं म्हटलं होतं त्यानुसार, हे ग्राह्य धरणं गरजेचं नव्हतं. त्यामुळं मी जो निकाल दिला आहे तो तंतोतंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच केलं आहे.


अशा प्रकारे मी सुप्रीम कोर्टानं जी त्रिसुत्री सांगितली त्यानुसार, शिवसेनेची घटना, संघटनात्मक रचना आणि विधीमंडळ पक्ष याचा विचार करुन निर्णय दिला आहे. पण तरीही शिवसेनेबाबत वारंवार खोटं बोलावं पण रेटून बोलावं हे दिसून येत आहे. त्यामुळं यापुढे मी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. राज्याची जनता सुज्ञ आहे पुढचा निकाल तेच देतील.


तसेच व्हिपबाबतही तीन निकष मी लावले. यामध्ये व्हिप म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती योग्य आहे का? त्याच व्यक्तीनं व्हिप काढला का? तसेच व्हिप योग्य पद्धतीनं पोहोचला का? हे मी तपासलं आणि कोणाचा व्हिप योग्य आणि त्यावरुन कोण पात्र आणि अपात्र हा निकाल दिला.