अदानीच्या गुंतवणुकीतील पैसा कोणाचा ? पंतप्रधान त्या व्यक्तीला पाठीशी का घालतात ? राहुल गांधीचा हल्लाबोल !

Santosh Gaikwad August 31, 2023 06:02 PM


मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. अदानी देशातील कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतात. मग ते धारावी असो की मुंबई विमानतळ ? अदानींच्या गुंतवणुकीतील पैसा कोणाचा ? अदानींचा की आणखी कोणाचा ?  पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यक्तीला पाठीशी का घालतात ? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. 


राहुल गांधी म्हणाले की, तीन वृत्तपत्रांनी अदानींच्या गुंतवणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील काही उद्योगपतींच्या कुटुंबियांशी काहींचे संबंध आहे. त्यातून पैशांची मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. हे अदानी यांचे पैसे आहेत की दुसरे कुणाचे आहेत?  

या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी लावला. या दोन व्यक्तींची नावे देखील त्यांनी सांगितली. गांधी  यांनी  गार्डीयन, फायनान्शियल एक्स्प्रेच्या बातम्यांचा दाखला देत गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबंधावर प्रश्न उपस्थित केले. अदानी कुटुंबाने आपल्या शेअरमध्ये स्वत:चे पैसे गुंतवून गैरव्यवहार केल्याचा आरोप यावेळी त्यांनी लावला. 


अदानींमार्फत 1 बिलिअन डॉलरची  गुंतवणुक परदेशात केली आहे.  यावेळी त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी अदानींविरोधात केल्या गेलेल्या चौकशीबाबतही शंका व्यक्त केली. गौतम अदानी यांच्या विरोधात सेबीद्वारे एक चौकशी करण्यात आली होती. त्या प्रकरणात त्यांना क्लिनचीट देण्यात आली. काही काळानंतर चौकशी करणाऱ्या सेबीच्या अधिकाऱ्याला अदानींच्या कंपनीत नोकरी मिळाली. त्यामुळे या अधिकाऱ्याने अदानीविरुद्ध जी चौकशी केली, ती संशयास्पद असल्याचे राहुल गांधी म्हणाले.