राहुल गांधींच्या केसवर अमेरिकेचं लक्ष !

santosh sakpal March 29, 2023 01:34 PM

वॉशिंग्टन : खासदारकी रद्द झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात अनेक अपडेट्स येत आहेत. खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, त्यांच्या केसवर अमेरिकेचंही लक्ष आहे.

राहुल गांधींवरील मानहानीचा खटला, त्यानंतर कोर्टाने दिलेली शिक्षा आणि रद्द झालेली खासदारकी यावरून आता देशातलं राजकारण तापलं आहे. राहुल गांधींवरील कारवाईनंतर आता देशभर आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात अमेरिकेला कोणताही हस्तक्षेप करायचा नाही. परंतु तिथल्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यावर अमेरिकेचं लक्ष आहे. अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे.


लोकशाही तत्त्वे अन् मानवी हक्कांच्या संरक्षणाचं महत्त्व आम्ही....
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी राहुल गांधी यांच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या सतत संपर्कात आहोत.
कायद्याचे शासन आणि न्यायालयीन स्वातंत्र्याचा आदर हे कोणत्याही देशाच्या लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि आम्ही भारतीय न्यायालयात सुरू असलेलं राहुल गांधींचं प्रकरण पाहात आहोत.