राही भिडे यांची पत्रकारिता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेची : शरद पवार

Santosh Gaikwad March 09, 2023 12:00 AM

राही भिडे यांची पत्रकारिता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेची : शरद पवार 

मुंबई : पत्रकारीता करीत असताना काही विचारधारा होती. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक उपेक्षित समाजाच्या माणसांची  कर्तृत्व शोधून त्यांना प्रोत्साहीत केले आणि ती माणसं मोठी केली. बाबासाहेबांचा आदर्श त्यांनी अखंडपणे जपला. त्या मालिकेत राही भिडेंचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ती विचारधारा त्यांनी स्वीकारली. तिच्याशी  तडजोड न करता त्यांनी पत्रकारिता केली, असे गौरोवोद्गार  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज काढले. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या माध्यमाच्या पटावरुन  या आत्मचरित्राचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. 

 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार संघाच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेच्या सभापती निलम गो-हे, रिपाइं नेते अर्जून डांगळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी मान्यवर पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन स्वागत केले. 

यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले कि,  राही भिडे यांनी ३५-४० वर्षे जी पत्रकारिता केली, व्यक्तिगत जीवनात त्यांना जे अनुभव आले व परिसरामध्ये जे घडतंय ते डोक्यात साठवून पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पुस्तक वाचल्यानंतर ते पूर्ण वाचल्यानंतर ठेवणार नाही याची मला खात्री आहे.  जागतिकीकरणाच्या रेटयामध्ये पत्रकारितेला मार्केटींगशी जोडण्यात आली, संपादकांची भूमिका व्यवसायाशी जोडली गेली असल्याचे राही भिडे यांनी   आत्मचरित्रात केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून पवार यांनी हा मजकूर वाचून दाखवित  हा बदल सरसकट आहे की नाही ? मला माहित नाही, मात्र हा बदल सरसकट असेल तर बाळशास्त्री जांभेकरांपासून जे उल्लेख केले जातात. ते उल्लेख करावा कि करू नये याचा विचार करण्याची वेळ आली का अशी शंका वाचल्यानंतर आल्याचे त्यांनी सांगितले. 
 
राही भिडेंच्या आयुष्याचा काही कालावधी बीड जिल्हयातील हस्ती गावात गेला. त्याविषयी बोलताना पवार म्हणाले की,  हस्ती मोठ गमतींच गाव आहे.  कष्ट करणा-यांच गाव आहे. या गावाने एखाद्यावर विश्वास टाकल्यानंतर त्याच्या मागे  मजबूतपणे उभं राहणं. एखाद्याशी विरोध करायच म्हटलं तर विरोध करणे हेच हस्तीचं वैशिष्टे आहे. माझ्या सार्वजनिक जीवनात महाराष्ट्रातील काही भाग माझया मागे मजबुतीने उभे राहायचे. बीड जिल्हयात विधानसभेच्या सहा जागा होत्या. एका निवडणुकीत सगळया जागेवर उमेदवार उभे केले ते सगळे विजयी झाले त्याचे योगदान हस्तीचं होतं अशी आठवण त्यांनी सांगितली. राही भिडेंनी जे काम केले त्याची  पार्श्वभूमी अस्ती गाव आहे असेही पवार यांनी सांगितलं. राही भिडे यांचे वडील  शासकीय रूग्णालयात कामाला होते. आजारी रूग्णाला जखमींना मदत करणे हेच त्यांचे कर्तृत्व होते. त्यामुळे तोच वारसा पुढच्या पिढीकडे आल्याचे पवार यांनी सांगितले.   

 माझयाबद्दल पत्रकारांमध्ये असलेले खास प्रेम अनेक वर्षापासून आहे. ते प्रेम मी अधून मधून बघत असतो. राही भिडे यांनी आत्मचरित्रात त्यांच्याबद्दल असलेल्या उल्लेख त्यांनी भाषणा केला.आमचे वृत्तपत्रांचे आणि शरद पवारांचे घनिष्ट संबध होते. संधी मिळेल तेव्हा ठोकायचं, रूक्ष असं लिहीयचं हे काम अखंडपणे करायचो अशी कबुली त्यांनी दिली. मात्र हा त्याचा दोष मी त्यांना देऊ इच्छित नाही. त्यांच्या मागे जी शक्ती होती कदाचित त्यांच्या शक्तीच्या संबधीचा उल्लेख असू शकेल असेही पवार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. महाराष्ट्रात राजकारणात कुठं काहीही घडलं की माझा उल्लेख होतं असे, लातूरला भूकंप झाला शरद पवार कारणीभूत असही एका पत्रकाराने लहिलं होतं असेही ते म्हणाले. २५ ते ३० वर्षाची सामाजिक स्थिती राजकीय स्थिती सामान्य व्यक्तींची एकंदर अवस्था पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केलं, हे वाचल्यानंतर तो काळ महाराष्ट्र कसा होता पत्रकारिता कशी होती त्याच अवलोकन करण्याची संधी  पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना मिळणार आहे असेही पवार यांनी सांगितले. 

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की,  पत्रकार कसा असावा तर स्पष्टपणे व बेधडकपणे लिहीणारा असावा ही योग्यता राहीताईंमध्ये आहे. त्यांची आत्मकथा नाही तर प्रचंड वेदनेने भरलेली आत्मकथा आहे. त्यांनी आत्मकथेत काहीही लपवलेलं नाही. या सगळया वातावरणात कर्तृत्वाच्या दुनियेत प्रभाव टाकण साधी गोष्ट नाही. 1998 पासून ते आतापर्यंतच्या राजकीय इतिहासाचे हे पुस्तक आहे. पद्मसिंह पाटलांच्या मुलाखतीचा किस्सा वाचला. त्यांच्या बंगल्यात छगन भुजबळांना लपवून ठेवलं होतं हे मला आताच कळालं. अमेरिकेच्या शोधक पत्रकारितेचे आपण नेहमी वाहवा करतो पण महाराष्ट्राच्या पत्रकाराने धाडस केलं आहे या आत्मचरित्रात इतिहासात नोंद करणा-या गोष्टी आहेत असेही ते म्हणाले.  
  निलम गो-हे म्हणाल्या की,  राही भिडे  यांनी ज्या परिस्थितीशी संघर्ष करीत पुढे आल्या त्याचे तोंडभरून कौतूक केलं पाहिजे. स्वकर्तृत्वावर आणि गुणवत्तेच्या जोरावर त्या पुढे आल्या. वर्तमान पत्रात जो इतिहास छापला जात नाही अशा आठवणी त्यांच्याकडे आहेत. पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. पण आत्मचरित्र लिहिणं मोठ गोष्ट आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी अर्जुन डांगळे, मधुकर भावे, सुजाता आनंदन यांचीही भाषणे झाली.  महिला दिनानिमित्त पत्रकार संघाच्यावतीने महिला पदाधिकारी यांचा  शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे संयुक्त कार्यवाह विष्णु सोनावणे यांनी आभार मानले.