धनगर समाज आक्रमक : विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा !

Santosh Gaikwad September 08, 2023 08:37 PM


सोलापूर :  धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून धनगर समाज आक्रमक झाला आहे. या मागण्यांसाठीच आज धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी राज्याच महसूल मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी थेट विखेर पाटलांवर भंडारा उधळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आपण या आंदोलकांना माफ केल्याचंही स्पष्ट केलं आहे.


राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भंडारा हा नेहमी पवित्र असतो. त्यामुळे निश्चितच पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाली त्याचा आनंद आहे. प्रतिकात्मक गोष्टी करण्याची कार्यकर्त्यांची भावना असते. त्यांनी काही वावगं केलं नाही. ज्या आंदोलकांनी माझ्यावर भंडारा उधळला. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नका. त्यांच्यावर कारवाई करू नका असे आदेश मी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, सुरक्षा रक्षक आणि भाजप कार्यकर्त्यांची ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. असा अचानक गोंधळ झाल्यावर अशी प्रतिक्रिया उमटत असते. सुरक्षा रक्षक संरक्षणासाठीच असतात. कार्यकर्त्यांनाही त्या क्षणी वाटलं ते केलं, असं विखे पाटील यांनी सांगितलं.


भंडारा उधळण्याच्या आणि आंदोलकांना मारहाण होण्याच्या एका घटनेमुळे भाजपवर काही परिणाम होणार नाही. मी निवेदन घेतलं नसतं, त्यांच्या भावनेचा आदर केला नसता आणि त्यांनी आंदोलन केलं असतं तर समजू शकलो असतो. पण मी निवेदन स्वीकारलं होतं. म्हणणं ऐकून घेत होतो. कोणत्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून मारहाण करण्याचा काही हेतू नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुष्कळ निर्णय झाले आहेत. संविधानात ज्या तरतूदी आहे, त्यावर खल सुरू आहेत. धनगर की धनगड यावर मार्ग काढला जात आहे. आरक्षण देण्याबाबत चर्चा आहे. पण त्यांना सर्व सवलती दिल्या आहेत. त्यांना वंचित ठेवलं नाही. नवीन महामंडळ तयार केलं आहे. 10 हजार कोटींचा आऊटलेट दिला आहे. 6 लाख कुटुंबांना शेळ्यामेंढ्यांचं क्लस्टर देणार आहोत. त्यात 75 टक्के अनुदान सरकार देणार आहे. मोठं पाऊल उचललं आहे. केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर थांबलो नाही. त्यापलिकडे जाऊन काम सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.