कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा : दिल्ली भेट सुफळ, विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Santosh Gaikwad February 18, 2024 06:08 PM


मुबई, दि.१८ :कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. केंद्राच्या निर्णयाचे  स्वागत असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव  खंबीरपणे उभे आहे हेच आजच्या  निर्णयातून स्पष्ट झाले झाले असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.


दोनच दिवसांपुर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली होती. निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी तसेच शेतकऱ्याचे होत असलेले अर्थिक नूकसांन याकडे मंत्री विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारने कांदा निर्यात बंदी बाबत केंद्र सरकारने फेरविचार करण्याबाबत पाठपुरावा सुरू होता असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेवून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेवून केंद्र सरकार  शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला असल्याचे विखे पाटील म्हणाले.


निर्यात बंदी होती तरी नाफेड मार्फत  कांदा खरेदी केंद्र सुरू करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती.राज्य सरकारने साडेतीनशे रुपयांचे अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे.केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असल्याचे आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून झालेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली विनंती मान्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.