भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव, पवारांचं वक्तव्य : राऊतांचा गौप्यस्फोट

Santosh Gaikwad April 16, 2023 06:04 PM

मुंबई  : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगला असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राऊत म्हणाले, मी आणि उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात शरद पवार याना भेटलो. त्यावेळी    राज्यातील राजकारण,  महाविकास आघाडी, यावर चर्चा झाली. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वापरून विरोधी पक्षाचे आमदार फोडायचे, यावरही चर्चा झाली. शिवसेने बरोबर   त्यांनी तेच तंत्र वापरलं आणि आमदार फोडले.  तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या बाबतीत वापरलं जात आहे. हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे, यावर चर्चा झाली.

राऊत म्हणाले,  शरद पवार यांनी सांगितलं, काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. कितीही दबाव असला तरी आम्ही तो निर्णय घेणार नाही, असं त्यांनी आम्हाला ठामपणे सांगितलं. यातच काही आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आहे. तपास यंत्रणांद्वारे मुलांना बोलावलं जात आहे . घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जातं, असे आमदार दबावात आहे. तो निर्णय त्यांचा असतो, तो निर्णय पक्षाचा नसतो, असं शरद पवार यांचं म्हणणं आहे.असे राऊत यांनी सांगितलं.