*बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेय* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन*
Santosh Sakpal
April 28, 2025 01:04 PM
मुंबई प्रतिनिधी
देशात आज विपरीत परिस्थिती आहे. त्या विपरीत परिस्थितीत बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्या संविधानाचा आदर आणि सन्मान करण्याचे काम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जायचा परंतु संविधान दिन साजरा करण्याचे काम मोदींच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केले आहे.
कांदिवली पूर्व येथील आकुर्ली म्हाडा वसाहत, लोखंडवाला कॉम्प्लेक्स जयंती उत्सव समितीतर्फे रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले कि, या कार्यक्रमांच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेबांची आठवण, ऊर्जा आपण घेऊन जात असतो. मी तर बाबासाहेबांच्या विचारांचा निस्सीम भक्त आहे. माझे महाविद्यालयीन जीवन सिद्धार्थ महाविदयालयात गेले. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा वेगळा पगडा माझ्या मनामध्ये निश्चित आहे. म्हणून या समाजाच्या हितासाठी, उत्कर्षांसाठी जेव्हा जेव्हा जे योगदान द्यायचे असते तेथे मी आपला भाऊ म्हणून सोबत राहिलेलो आहे. आज आपण जयंती उत्सव साजरा करतोय. छत्रपती शिवरायांचे आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वागले पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्यावर अनंत उपकार केलेत. ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांची पावले लागली आहेत त्या पंचतीर्थालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान देण्याचे काम होत असल्याचे दरेकर म्हणाले.
याप्रसंगी प्रसिद्ध गायिका भीमकन्या कडुबाई खरात, आरपीआय जिल्हा प्रमुख रमेश गायकवाड, समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे, सचिव राजू ससाणे, खजिनदार नामदेव ढवळे, पपू काळे, सुरेखा पाटील, मनोज पाटील, अविनाश राय यांसह आंबेडकरी समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.