सर्वसामान्यांना सुख, समृध्दी मिळू दे" - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

Santosh Gaikwad September 19, 2023 05:24 PM


*‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना*


मुंबई, दि. १९ – गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. 


दरवर्षाप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी  गणरायांचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी.l लता शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू . रुद्रांश यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती करुन प्रतिष्ठापना केली. 


यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस उत्साहाचा असून विघ्नहर्ता गणरायाचे सर्वत्र आगमन झाले आहे. गेल्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला होता. या वर्षी देखील गणेशोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा होत आहे. जी सार्वजनिक गणेश मंडळे नियमानुसार गणेशोत्सव साजरा करतात त्यांना सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी द्यावी, मंडपासाठी शुल्क आकारणी करु नये अशा सूचना प्रशासनाला दिल्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आजपासून संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात होणार असून याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. भारताचे नाव जगभरात उज्वल होत असून तो लौकिक अजून वाढविण्यासाठी गणपती बाप्पा प्रधानमंत्री  मोदी यांना बळ देतील, आशिर्वाद देतील असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या जनहिताच्या विविध निर्णयांचे स्वागत केले. 


हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे.  ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नियम बाजूला ठेवून मदत केली.मदतीची रक्कम दुप्पट मदत केली. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजाराची मदत,  एक रुपयात पिकविमा दिला आहे. संकटकाळात शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.