प्रमोद सुर्वे क्रिकेट स्पर्धेत एम.एम. मोटर्स, समीर स्मॅशर्स उपांत्य फेरीत

Santosh Sakpal May 15, 2023 05:15 AM

मुंबई   :अमीर बिल्डींग हितचिंतक नवरात्रौत्सव मंडळ-डोंगरी आयोजित क्रिकेटपटू प्रमोद सुर्वे स्मृती चषक लीग क्रिकेट स्पर्धेत एम.एम. मोटर्स, समीर स्मॅशर्स संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. अतिशय चुरशीच्या सामन्यात एम.एम. मोटर्सने व्ही.पी. वॉरीयर्सचा एका धावेने पराभव केला. एम.एम. मोटर्सचा अष्टपैलू रमजू सय्यदला सामनावीर पुरस्काराने क्रिकेटप्रेमी दीपक सुर्वे, क्रिकेटपटू राजेश सुर्वे, अनंत सुर्वे, पार्थ सुर्वे, सिध्देश सुर्वे, साईश सुर्वे आदी मान्यवरांनी गौरविले. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात समीर स्मॅशर्सने दीक्षिता इलेव्हनचे आव्हान २२ धावांनी संपुष्टात आणले.


    व्ही.पी. वॉरीयर्सच्या मधुसूदन कांबळेच्या (७ धावांत ३ बळी) पहिल्या षटकातील भेदक गोलंदाजीमुळे एम.एम. मोटर्सच्या प्रमुख फलंदाजांना खेळपट्टीवर फार वेळ तग धरता आले नाही. तरीही एम.एम. मोटर्सने मर्यादित ५ षटकात ६ बाद ३७ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या व्ही.पी. वॉरीयर्सच्या फलंदाजांना जखडून ठेवणारा मारा एम.एम. मोटर्सच्या सर्वच गोलंदाजांनी केला. निर्णायक क्षणी फैजान वेल्डरची (१७ चेंडूत २० धावा) महत्वपूर्ण विकेट पडताच व्ही.पी. वॉरीयर्सला एका धावेच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.


    देव गोहिल (१४ चेंडूत २६ धावा) व रोहन पारकर (१४ चेंडूत २२ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे समीर स्मॅशर्सने दीक्षिता इलेव्हनविरुध्द ५ षटकात २ बाद ५३ धावा फटकाविल्या. श्रीलेश अमरेने (१५ चेंडूत २५ धावा) दमदार फलंदाजी करूनही दीक्षिता इलेव्हनचा डाव पाचव्या षटकाला ३ बाद ३१ धावसंख्येवर रोखणारी गोलंदाजी ओमकार फडले (३ धावांत १ बळी) व रोहन पारकर (१९ धावांत १ बळी) यांनी केली. परिणामी समीर स्मॅशर्सने २२ धावांच्या फरकाने लढत जिंकली. रोहन पारकरने सामनावीर पुरस्कार पटकाविला.


************************************