प्रमोद सुर्वे स्मृती लीग क्रिकेटमध्ये शनिवारपासून १० संघ झुंजणार

Santosh Sakpal May 11, 2023 11:52 PM

MUMBAI : क्रिकेटपटू प्रमोद सुर्वे स्मृती चषक लीग क्रिकेट स्पर्धेत डोंगरी परिसरामधील दर्जेदार क्रिकेटपटूंचे बलाढ्य १० संघ प्रतिष्ठेचा प्रमोद सुर्वे स्मृती चषकासह रु.८८,८८८/- पुरस्कार पटकाविण्यासाठी डोंगरी येथील छत्रपती वीर संभाजी मैदानात १३ व १४ मे रोजी झुंजणार आहेत. अमीर बिल्डींग व हितचिंतक नवरात्रोत्सव मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कारासह आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूला पुरस्काररूपाने फ्रीजची अनोखी भेट देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक क्रिकेटपटू राजेश सुर्वे यांनी दिली.

प्रथम साखळी व त्यानंतर बाद पद्धतीने द्वितीय प्रमोद सुर्वे स्मृती क्रिकेट स्पर्धा दोन दिवस रंगणार आहे. साखळी अ गटात वीरेंद्र पाटीलचा व्ही.पी. वॉरीयर्स, जुगनू सिंहचा सिंह पॅकर्स डोंगरी, मधुसूदन अमरेचा एम.एम. अमरेज, झुबेर सय्यदचा समीर स्मॅशर्स, केदार आंबरेचा केएसए स्पोर्ट्स तर साखळी ब गटात महेंद्र पटेलचा दीक्षिता इलेव्हन, शाहनवाझ खानचा शानूज स्ट्रायकर्स, मुबीन मुल्लाचा एम.एम.मोटर्स, नासीर पटनीचा डोंगरी वॉरीयर्स, स्मित सुळेभाविकरचा रुद्र रेनेगडेज आदी संघांमध्ये चुरस होईल. अंतिम उपविजेत्यास रु.५५,५५५/- व चषक, तृतीय क्रमांकास रु.३३,३३३/- व चषक आणि वैयक्तिक पुरस्कारसुध्दा दिले जाणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनंत सुर्वे, दीपक सुर्वे, विलास मटाले, अविनाश दुधाणे, चंद्रकांत करंगुटकर, वीरेंद्र पाटील, नरेश तोडणकर, प्रशांत म्हात्रे आदी मंडळी कार्यरत आहेत.