येत्या १५ दिवसांत दोन मोठे राजकीय स्फोट होणार; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

SANTOSH SAKPAL April 16, 2023 06:08 PM

MUMBAI : सध्या महाराष्ट्रातील राजकारणात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महाविकास आघाडीवर नाराज असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. येत्या १५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा, प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमाला रविवारी, १६ एप्रिलला प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राज्यात सुरू असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, येत्या १५ दिवसांत बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रात होईल. तेव्हा आपण १५ दिवसांची वाट पाहूयात. दोन ठिकाणी मोठे बॉम्बस्फोट होतील. तसेच ठाकरे गटासोबत वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू आहेत. त्यामुळे आमच्या युतीची काळजी करू नका, असा विरोधकांना आंबेडकरांनी टोला लगावला.

जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा केला. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, पुलवामाबाबत त्यावेळी ही मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली. त्याला प्रोटेक्शन नव्हते. ही माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होते. दहा गाड्या कॅनॉव्हबद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे, ती बाब यांना माहिती नसावी. यांची साधी चौकशी सुद्धा नाही. राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.