३१ डिसेंबरला प्रल्हाद नलावडे स्मृती मोफत शालेय कॅरम स्पर्धा

Santosh Sakpal December 21, 2023 12:39 PM

MUMBAI/SHIVNER

कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त १५ वर्षाखालील शालेय मुलांमुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा ३१ डिसेंबर रोजी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आली आहे. श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स-चेंबूर व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने होणाऱ्या कॅरम स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.

स्व. प्रल्हाद नलावडे यांनी स्थानिक पातळीवरील उदयोन्मुख कॅरम खेळाडूंना मोफत कॅरम स्ट्रायकर देत प्रोत्साहन दिले होते. विशेषतः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत झालेल्या पहिल्या मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेमधील बहुतांश शालेय खेळाडूंना त्यांनी विनाशुल्क कॅरम स्ट्रायकर देऊन कॅरमकडे आकृष्ट केले होते. त्यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी तसेच शेकडो पालक वर्गाने त्यांचे विशेष कौतुक केले होते.

कॅरमप्रेमी अविनाश नलावडे देखील प्रतिवर्षी वडिलांच्या स्मृतीदिनी शालेय कॅरम खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. श्री नारायण गुरु कॉलेज-चेंबूर पश्चिम येथे होणाऱ्या स्पर्धेतील सहभागी उदयोन्मुख खेळाडूंना तज्ञ तसेच क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. इच्छुक शालेय १५ वर्षाखालील मुलांमुलींनी मोफत प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे २२ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.