भावी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस, अजितदादांचे झळकले पोस्टर

Santosh Gaikwad April 25, 2023 06:15 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार असून राज्यातील शिंदे सरकार कोसळणार अशी चर्चा रंगली आहे त्यातच आता भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे पोस्टर झळकल्याने राजकीय चर्चांना अधिकच रंग चढला आहे. 


शिवसेनेला खिंडार पाडीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  ४० आमदारांनी भाजपला साथ दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर  भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना विराजमान करून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. राज्यातील शिंदे सरकार कोसळणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री पदावर भाजपकडून सातत्याने दावा सांगितला जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून आमचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे, असं वारंवार सांगण्यात येत आहे. एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं असताना दुसरीकडे आता नागपूरमध्येही देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. नागपूर शहरातील बुटीबोरी परिसरात ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस  हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे होर्डिंग्ज लागल्याचं दिसून येत आहे. बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावले होर्डिंग्ज सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत. 


दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. यातच अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत.  तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे. आज सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. अजित पवार यांच्या सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, एकीकडे राज्यात अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली असतानाच आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील, अशा आशयाचे बॅनर नागपुरात लागले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत येणाऱ्या दिवसांत काय होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.