संसदेत मोदींचे अखेरचं भाषण : नेहरू, गांधी अटलजींच्या जागवल्या आठवणी !

Santosh Gaikwad September 18, 2023 05:41 PM

 आजपासून नव्या संसद इमारतीतून कामकाज

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यापासून कामकाज होत असलेल्या संसदेच्या इमारतीमधील संसदीय कामकाजाचा सोमवारी अखेरचा दिवस ठरला. मंगळवारी (१९ सप्टेंबर) संसदेचे कामकाज नवीन संसद इमारतीमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसद भवनामध्ये सव्वा तास अखेरचे भाषण केले.  ऐतिहासिक जुन्या संसदेला अलविदा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अतिशय भावनिक भाषण केलं. मोदी म्हणाले, जुन्या संसदेतून नव्या संसदेत जाताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ झालाय. माझ्या मनात अनेक आठवणींचे ढग दाटून आलेत. देशाला स्वातंत्र मिळाल्यासून भारताकडे एका शंकेच्या नजरेने पाहिले जायचे. परंतु गेल्या ७५ वर्षात भारताने सगळ्याच क्षेत्रात अद्वितीय प्रगती केली. यात नेहरूंजींपासून-इंदिरा गांधी आणि अटलजींपासून-मनमोहन सिंग या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. देशाच्या प्रगतीसाठी कष्ट घेतलेल्या सगळ्यांना नमन करतो, अशा भावूक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेचा उंबरठा ओलांडताना संसदेतील गत आठवणींना उजाळा दिला.


केंद्र सरकारने  १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, “जुन्या संसद भवनात संघर्ष आणि उत्सवाचे वातावरण अनुभवले. जुन्या संसदेत अनेक गोड आणि कडू आठवणी आहेत. जुन्या संसदेतून बाहेर पडणे हा भावनिक क्षण आहे.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आपण ऐतिहासिक संसद भवनातून निरोप घेतोय. पण, जुने संसद भवन येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. भारताचे संसद भवन उभारण्याचे निर्णय ब्रिटीश शासनाचा होता. संसद भवन उभारण्यासाठी पैसे आणि मेहनत भारतीयांची होती,” असे पंतप्रधान मोदींनी संसदेत बोलताना म्हटले.
 
 मोदी म्हणाले, ‘हे सभागृह सोडणे हा अतिशय भावनिक क्षण आहे. एखादं कुटुंबही जेव्हा जुनं घर सोडून नवीन घरात जात असतं तेव्हा अनेक आठवणी दाटून येतात. आम्ही जेव्हा ही संसद सोडून जात आहोत तेव्हा आमच्या मन मस्तिष्कमध्येही भावनांचा, आठवणींचा काहूर आहे. यामध्ये उत्साहवर्धक क्षण आहेत, काही नोक-झोंक आहे तर काही हसरे तर काही, कडवट क्षण आहेत, जे आमच्यासोबत राहाणार आहेत. हे ते सभागृह आहे जिथे पंतप्रधान पंडित नेहरुंच्या स्ट्रोक ऑफ मिडनाईटचा घोष आजही आम्हाला प्रेरणा देतो. इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील बांगलादेशाच्या मुक्तीसंग्रामाचे आंदोलन देखील या सभागृहाने पाहिले आहे. ‘या सभागृहाने कॅश फॉर व्होट आणि कलम 370 रद्द होतानाही पाहिले आहे. वन नेशन, वन टॅक्स, जीएसटी, वन रँक वन पेंशन, गरीबांना 10% आरक्षण देखील या सभागृहाने दिले आहे.’


पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षावरही निशाणा साधला, ते म्हणाले, ‘या सभागृहात अशा अनेक गोष्टी घडल्या जेव्हा टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत झाले पाहिजे होते, मात्र त्यातही राजकारण केलं गेलं. नेहरुजींचे गुणगाण जर या सभागृहात केले गेले तर असा कोण सदस्य आहे जो त्यावर टाळ्या वाजवणार आही. शास्त्रीजींनी 65 च्या युद्धावेळी याच सभागृहातून देशाच्या सैनिकांना प्रोत्साहित केले होते. तर इंदिरा गांधींनी याच सभागृहातून बांगलादेश स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व केले होते. पंतप्रधानांनी 2001 च्या संसदेवरील हल्ल्याचाही उल्लेख केला. मोदी म्हणाले, ‘हा हल्ला इमारतीवर नाही तर आमच्या आत्म्यावर झाला होता. हा देश त्या घटनेला कधीही विसरु शकत नाही. दहशतवाद्यांशी लढताना ज्या सुरक्षरक्षकांनी जीवाची बाजी लावली त्यांनाही आपण कधीही विसरु शकत नाही. सदस्यांना वाचवण्यासाठी जा सैनिकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या त्यांनाही आज मी नमन करतो’

‘स्वातंत्र्यपूर्वकाळात भगतसिंगांनी याच सभागृहात बॉम्ब फेकून आपला आवाज इंग्रज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम केले होते. याच सभागृहात स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ आकाराला आले. याच सभागृहात दोन वर्षे 11 महिने संविधानावर चर्चा झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. स्वांतत्र्यानंतर या इमारतीला संसद म्हणून ओळख मिळाली. या इमारतीच्या निर्मितीचा निर्णय भलेही विदेशी शासकांचा असला तरी या इमारतीच्या निर्माणासाठी आपल्याच देशवासियांनी घाम गाळला होता. पैसा देखील आपल्याच देशवासियांचा होता.’

 मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर संसद भवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकवून लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश केला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गरीबाचा मुलगा संसदेत पोहचला हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. देश मला एवढा आशीर्वाद आणि माझ्यावर इतके प्रेम करेल, यांची कल्पना देखील करू शकत नाही,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. “चांद्रयान-२च्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन हा आपल्यासाठी सेलिब्रेशनचा विषय आहे. जी-20 परिषदेचे यश हे भारतातील 140 कोटी जनतेचे आहे. भारत जगात ‘विश्वमित्र’च्या भूमिकेत आहे,” असे पंतप्रधान मोदींनी जी-20च्या यशाबद्दल संसदेत म्हणाले.


 काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरींचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘पोखरणच्या काळात विदेशी शक्तींनी अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही थांबलो नाही. अटल बिहारी वाजपेयींनी जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. अणु परीक्षणानंतर देशावर अनेक बंधने घालण्यात आली होती, भाजप ज्यांच्यावर मौन राहाण्याचा आरोप करते, त्याच मनमोहनसिंगांच्या नेतृत्वातील सरकारने ते दूर करण्याचे काम केले.

 मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

राज्यसभेमध्ये काँगस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आम्हाला नेहमी एकच प्रश्न विचारला जातो, गेल्या ७० वर्षांमध्ये काय झाले? तर, आम्ही ७० वर्षांत केलेल्या कामाला पुढे घेऊन जाण्याचेच काम फक्त तुम्ही करत आहात, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.  खर्गे म्हणाले, ‘1950 मध्ये जेव्हा आम्ही लोकशाहीचा स्वीकार केला तेव्हा अनेक परदेशातील विद्वानांनी म्हटले होते की भारतासारख्या देशात लोकशाही अपयशी ठरेल, कारण येथे अशिक्षीत लोक आहेत. आम्ही त्या सर्व विद्वानांना खोटं ठरवलं. ही आमची ७० वर्षांतील कमाई आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा मुद्दाही उपस्थित केला.