PM मोदींचा राष्ट्रवादीवर ७० हजार कोटीचा घोटाळयाचा आरोप, शरद पवारांचे प्रतिउत्तर ...

Santosh Gaikwad June 27, 2023 09:16 PM


मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रवादीवर तब्बल ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदी यांनी कथित शिखर बँक घोटाळा, जलसिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. राष्ट्रवादीवर केलेल्या गंभीर आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


मोदी यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो उल्लेख केला, ते शिखर बँक प्रकरण कोर्टात गेले आहे. माझा त्या शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही, अशा संस्थेसोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे'. देशात मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात. देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात. मात्र ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असेही पवार म्हणाले.


शरद पवार पुढे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला, मी कधी शिखर बँकेचा सदस्य नव्हतो. मी कधी कर्ज घेतले नव्हते'. 'मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. याबाबत बोलणे कितपत ठिक आहे? पाटबंधारे खात्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं, मात्र ते काही खरे नाही, असेही पवार पुढे म्हणाले.